20 November 2019

News Flash

बेल्स खाली पडेना, फलंदाज बाद होईना?

‘एलईडी’ बेल्सची निर्मिती कशी होते?

यंदाच्या विश्वचषकात आतापर्यंत तब्बल पाच वेळा चेंडूने यष्टय़ांना स्पर्श करूनदेखील बेल्स खाली पडत नसल्यामुळे सर्वच संघ चिंतेत आहेत. गोलंदाजांच्या दुर्दैवाची चर्चा रंगत असतानाच यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) लवकर तोडगा काढावा, असेही काही जाणकारांनी सुचवले आहे. परंतु स्पर्धेदरम्यान कोणत्याही प्रकारचे बदल केले जाणार नाहीत, जेणेकरून स्पर्धेच्या एकात्मतेला धक्का पोहोचेल. १० संघांमध्ये होणाऱ्या सर्व ४८ सामन्यांसाठी सारखीच साधनसामग्री वापरली जाईल, असे ‘आयसीसी’ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ‘बेल्स खाली पडेना, फलंदाज बाद होईना’ या विश्वचषकामधील आव्हानाचा घेतलेला वेध-

‘एलईडी’ बेल्सची निर्मिती कशी होते?

साधारणपणे यष्टय़ा बनवण्यासाठी लाकूड वापरले जाते, परंतु ‘एलईडी’ यष्टय़ांमध्ये प्लास्टिकचे थर एकमेकांवर रचले जातात. या प्लास्टिकच्या थरांमध्ये ‘एलईडी’ दिवे बसवून यष्टी व बेल्स दोघांमध्ये मायक्रोप्रोसेसर बसवले जाते. चेंडूचा यष्टय़ांना स्पर्श होताच हे मायक्रोप्रोसेसर एकमेकांपासून वेगळे होऊन दिवे पेटतात.

ऑस्ट्रेलियाच्या ब्राँटे अ‍ॅकरमनने या ‘एलईडी’ यष्टय़ांची निर्मिती केली. जुलै २०१३ मध्ये ‘आयसीसी’ने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये या यष्टय़ांच्या वापरासाठी अधिकृत परवानगी दिली. त्यानंतर २०१४च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेत याचा सर्वप्रथम उपयोग करण्यात आला. मात्र ही संकल्पना २०१२च्या बिग बॅश लीगमधून आली. एका सामन्याच्या संपूर्ण सहा ‘एलईडी’ यष्टय़ांचा (बेल्ससह) संच बनवण्यासाठी तब्बल २५ लाख रुपये मोजावे लागतात.

यंदाच्या विश्वचषकातील घटना

  • इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका (३० मे) – विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात ‘बेल्सनाटय़’ पाहायला मिळाले. इंग्लंडच्या आदिल रशीदने टाकलेल्या एका चेंडूने क्विंटन डी’कॉकला चकवले, पण चेंडूने यष्टय़ांना स्पर्श केल्यानंतर यष्टीरक्षकालाही चकवून थेट सीमारेषा ओलांडली.
  • न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका (१ जून) – वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर कट मारण्याच्या नादात श्रीलंकेच्या दिमुथ करुणारत्नेने चेंडू यष्टय़ांवर ओढवून घेतला. मात्र या वेळी बेल्स काही सेकंद हवेत उडून पुन्हा यष्टय़ांवर जाऊन बसल्याने करुणारत्नेला नाबाद ठरवण्यात आले.
  • ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज (६ जून) – सर्वात वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ख्रिस गेलला झेलबाद केले. परंतु गेलने दाद मागताच ‘रिप्ले’मध्ये चेंडूने बॅटला नसून यष्टय़ांना स्पर्श केल्याचे निदर्शनास आले. या वेळीही बेल्स खाली पडल्या नाहीत.
  • इंग्लंड विरुद्ध बांगलादेश (८ जून) – बेन स्टोक्सच्या चेंडूवर पूल करण्याच्या प्रयत्नात बांगलादेशच्या मोहम्मद सैफुद्दीनने चेंडू यष्टय़ांवर ओढवून घेतला, मात्र येथेही फलंदाज नशीबवान ठरला.
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (९ जून) – जसप्रीत बुमरासारख्या वेगवान गोलंदाजाने टाकलेल्या चेंडूने डेव्हिड वॉर्नरच्या बॅटची कड घेऊन यष्टय़ांचा वेध घेतला. परंतु चेंडूने यष्टय़ांना फक्त स्पर्श केला व पुन्हा एकदा बेल्स खाली पडल्या नाहीत.

आयसीसी’चा नियम काय सांगतो?

‘आयसीसी’च्या नियमानुसार एखाद्या फलंदाजाला तेव्हाच बाद ठरवले जाते, ज्या वेळी बेल्स खाली पडतात अथवा यष्टी संपूर्ण उद्ध्वस्त होते. नियम क्रमांक २९च्या कलम १.२ नुसार बेल्स फक्त हवेत उडून अथवा त्यातील दिवा पेटून पुन्हा त्या यष्टय़ांवरच राहिल्या तर फलंदाजाला नाबाद घोषित करण्यात येते.

मर्यादित षटकांच्या सामन्यात गोलंदाजांना आधीच चुका करण्यास कमी वाव असतो. अशात आता बेल्सनीसुद्धा त्यांची साथ सोडल्यास त्यांनी काय करावे? त्यामुळे ‘आयसीसी’ने किमान बेल्सचे वजन कमी करावे. पूर्वी बेल्स हवेच्या वजनाने आपोआप पडायच्या, हे मान्य आहे. मात्र त्यासाठी अधिक वजनाच्या बेल्स बसवून तुम्ही गोलंदाजांवर अन्याय करू  शकत नाही. त्याशिवाय यष्टय़ांमधील बेल्स लावण्याचे खाचेही थोडे कमी खोल असले तर त्या लगेच निघू शकतील.  – चंद्रकांत पंडित, प्रशिक्षक

First Published on June 13, 2019 1:39 am

Web Title: icc cricket world cup 2019 led bails in cricket
Just Now!
X