नॉटिंगहॅम : भारताचा अपवाद वगळता विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या दिशेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. गुरुवारी त्यांच्यापुढे धक्कादायक निकालासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशचे आव्हान समोर असेल. त्यामुळे सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या शाकिब अल हसनला जेरबंद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाला विशेष रणनीती आखावी लागणार आहे.

विश्वचषकाच्या गुणतालिकेत सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडनंतर दुसऱ्या स्थानावर आहे. दोन्ही संघांच्या खात्यावर पाच सामन्यांत प्रत्येकी आठ गुण जमा असले तरी ऑस्ट्रेलियापेक्षा (०.८१२) इंग्लंडची (१.८६२) निव्वळ धावगती सरस आहे. ऑस्ट्रेलियाचे पारडे या सामन्यात जड असले तरी जिगरबाज बांगलादेशचा संघ सहजासहजी हार पत्करणार नाही.

विश्वचषक अभियानाचा प्रारंभ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध २१ धावांनी विजय मिळवून करणाऱ्या बांगलादेशने विंडीजला हरवून पाच सामन्यांत पाच गुण मिळवले आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीसाठी आणखी एक स्पर्धक वाढला आहे. सलामीवीर तमिम इक्बाल आणि यष्टिरक्षक-फलंदाज मुशफिकर रहिम जबाबदारीने फलंदाजी करीत आहेत. लिटन दासने विंडीजविरुद्ध ६९ चेंडूंत नाबाद ९४ धावांची धडाकेबाज खेळी साकारली होती. परंतु विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला विजय मिळवायचा असेल, तर बांगलादेशला गोलंदाजीतसुद्धा सुधारणा करावी लागणार आहे.

गेल्या चार सामन्यांत आम्ही  इंग्लंड, विंडीज, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका संघांच्या सर्वोत्तम वेगवान गोलंदाजीच्या माऱ्याचा हिमतीने सामना केला आहे. इंग्लंड आणि विंडीजकडे ताशी १४०-१५० किमी वेगाने चेंडू टाकणारे गोलंदाज आहेत. त्यामुळे आम्हाला ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्याची चिंता वाटत नाही. या आव्हानांचा सामना करण्याची पुरेशी क्षमता आमच्याकडे आहे.

– शाकिब अल हसन, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू

सामना क्र. २६

ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश

’स्थळ : ट्रेंट ब्रिज क्रिकेट ग्राऊंड, नॉटिंगहॅम

’सामन्याची वेळ : दुपारी ३ वा.

’थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि २,

स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, स्टार स्पोर्ट्स हिंदी १

संघ

ऑस्ट्रेलिया : आरोन फिंच (कर्णधार), जेसन बेहरेंड्रॉफ, अ‍ॅलेक्स केरी (उपकर्णधार व यष्टीरक्षक), नॅथन कोल्टर नाइल, पॅट कमिन्स उस्मान ख्वाजा, नॅथन लायन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्ड्सन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

बांगलादेश : मश्रफी मोर्तझा (कर्णधार ), तमिम इक्वाल, सौम्य सरकार, लिटन दास, मुशफिकर रहीम, महम्मदुल्ला, शाकिब अल हसन, महम्मद मिथुन, साबीर रहमान, मुसद्दीक हुसेन, मोहम्मद सैफुद्दीन, मेहदी हसन, रुबेल हसन, मस्तफिझूर रहमान, अबू झायेद.

झम्पाला संधी मिळणार?

ऑस्ट्रेलियाने पहिल्या तीन सामन्यांत लेग-स्पिनर अ‍ॅडम झम्पाला संघात स्थान दिले होते. यापैकी दोन सामने जिंकले होते. मात्र मागील दोन सामन्यांत त्यांनी कामचलाऊ फिरकी गोलंदाज ग्लेन मॅक्सवेलचा त्यांनी अधिक वापर केला. पाकिस्तानविरुद्ध स्वत: आरोन फिंचनेही काही षटके टाकली. मात्र बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात झम्पा किंवा ऑफ-स्पिनर नॅथन लायनला संधी मिळू शकेल.