|| प्रशांत केणी

विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या १२व्या अध्यायाचे विजेते कोण?.. अर्थात इंग्लंड! हे या प्रश्नाचे स्वाभाविक उत्तर असले तरी अंतिम सामन्यात ते ना मैदानी लढाई जिंकले, ना न्यूझीलंडचा संघ हरला. धावफलकाची आकडेवारी नेमके हेच सांगते आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमानुसार घोषित करण्यात आलेला विश्वविजेता संघ म्हणजे इंग्लंड, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. उत्कंठा शिगेला पोहोचवणाऱ्या या अंतिम सामन्याचे कवित्व क्रिकेटच्या इतिहासात सदैव अजरामर राहील; परंतु सध्या ‘आयसीसी’च्या ‘टाय’ लढतीसंदर्भातील नियमाची चर्चा ऐरणीवर आहे.

कारण ५० षटकांच्या सामन्यात समान धावसंख्या झाल्यामुळे ‘टाय’ झालेली ही लढत निकाली ठरवण्यासाठी ‘सुपर ओव्हर’चा अवलंब करण्यात आला; परंतु यातही ‘टाय’ झाल्यामुळे दोन्ही संघांचे सामन्यातील आणि ‘सुपर ओव्हर’मधील चौकार आणि षटकारांची एकूण संख्या मोजण्यात आली. यात इंग्लंडने (२६) न्यूझीलंडवर (१७) कुरघोडी केली. हे सीमापार फटके समान झाले असते, तर त्यावरही तोडगा काढणारा नियम ‘आयसीसी’कडे उपलब्ध होता. अशा परिस्थितीत ‘सुपर ओव्हर’मधील अखेरच्या चेंडूवर दोन्ही संघांपैकी सरस कामगिरी कुणाची, हे ग्राह्य़ धरले असते. इंग्लंडच्या फलंदाजाने अखेरच्या चेंडूवर चौकार खेचला होता, तर न्यूझीलंडचा फलंदाज बाद झाला होता. त्यामुळे आणखी एका नियमाची अनुकूलता ही इंग्लंडच्याच बाजूने होती.

२००७च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामना हा ‘बॉल आऊट’च्या नियमाने निकाली ठरवण्यात आला होता. दोन्ही संघांनी एक षटक म्हणजेच सहा चेंडूंसह यष्टीचा वेध घेण्याचे हे फुटबॉलमधील पेनल्टी शूटआऊटच्या धर्तीवरील आव्हान भारताने लीलया पेलले होते. कालांतराने २०१२ मध्ये ‘आयसीसी’ने ‘टाय’ लढत निकाली ठरवण्यासाठी ‘सुपर ओव्हर’चा नियम अमलात आणला. त्याआधी, १९९९च्या विश्वचषकामधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना ‘टाय’ झाला होता; परंतु त्या वेळी ‘सुपर सिक्स’ फेरीमधील सरस संघाला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले. ‘सुपर सिक्स’ टप्प्याअंती दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा गुण मिळवल्यामुळे गुणसंख्या समान होती; परंतु निव्वळ धावगतीमध्ये ऑस्ट्रेलियाचा (०.३६) संघ दक्षिण आफ्रिकेपेक्षा (०.१७) सरस ठरला.

१९८४च्या बेन्सन अँड हेजेस वर्ल्ड सीरिज चषक क्रिकेट स्पध्रेच्या सर्वोत्तम तीन अंतिम सामन्यांतील दुसरी लढत ही एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली ‘टाय’ लढत मानली जाते. ती लढत ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाली होती. १९८९च्या दुसऱ्या ‘टाय’ लढतीमध्येही ऑस्ट्रेलियाचा समावेश होता. एकदिवसीय क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात ४० लढती ‘टाय’ झाल्या आहेत. यापैकी बहुतांशी सामने हे साखळीमधील किंवा मालिकेतील असल्यामुळे ते निकाली लावण्यासाठी कोणतेही नियम लावण्याची आवश्यकता नव्हती; परंतु बाद फेरीतील सामन्यांसाठी या नियमांची गरज असते.

या ‘टाय’ लढतींपैकी आतापर्यंत तीन सामने विशिष्ट नियमानुसार निकाली ठरवण्यात आले आहेत, यापैकी एक सामना म्हणजे इंग्लंड-न्यूझीलंड यांच्यातील विश्वचषकाची अंतिम लढत. त्याआधीचे दोन सामने ज्यांचे कमी फलंदाज बाद झाले, तो विजयी या नियमानुसार निकाली ठरवले गेले. १९८७च्या भारत-पाकिस्तान मालिकेतील तिसरा सामना भारताने जिंकला, तर १९८८ मध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यातील मालिकेमधील तिसरा सामना पाकिस्तानने जिंकला.

‘टाय’ लढती निकाली ठरवण्यासाठी योग्य नियमावली आणण्याचे ‘आयसीसी’चे अभियान सुरूच आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामुळे ‘सुपर ओव्हर’मधील उणेपणा आणि ती ‘टाय’ झाल्यास काय, हा नवा पेच निर्माण झाला आहे. या सामन्यानंतर क्रिकेट क्षेत्रात आणि समाजमाध्यमांवर तीव्र पडसाद उमटले. सर्वाधिक सीमापार फटक्यांची संख्या हा नियम कुणालाच फारसा रुचलेला नाही. अपरिपक्व नियमांपेक्षा विश्वचषकाचे संयुक्त विजेते म्हणून इंग्लंड आणि न्यूझीलंडला घोषित करणे योग्य ठरले असते, असे समर्थन बरेच जण करीत आहेत. याचप्रमाणे भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरने आणखी एक ‘सुपर ओव्हर’ खेळवण्याचा पर्याय सुचवला आहे.

तूर्तास, ‘आयसीसी’ने आता या नियमांचा पुनर्विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे. चौकार, षटकार आणि किती फलंदाज गमावले, असे ठोकताळे लावण्यापेक्षा मैदानी निकाल क्रिकेट क्षेत्राला अपेक्षित आहे.