|| गौरव जोशी

टनब्रिज वेल्स या नावाचा उल्लेख कोणत्याही व्यक्तीच्या बोलण्यात किंवा पुस्तकात झाला तर सर्वात प्रथम कपिल देव यांनी केलेल्या नाबाद १७५ धावांची खेळी आठवते. लंडनपासून ५० किलोमीटर अंतरावर वसलेले टनब्रिज वेल्स हे एक छोटे गाव आहे. कपिल यांनी याच मैदानावर १८ जून १९८३ या दिवशी झिम्बाब्वेविरुद्ध इतिहास घडवला होता. हे मैदान केंट कौंटी संघाचे आहे. तिथे जाण्यासाठी रेल्वे स्थानकसुद्धा आहे. टनब्रिज गावातील बहुतांशी मालमत्ता या जमीनदार आणि श्रीमंत लोकांच्या मालकीच्या आहेत.

नेव्हिल मैदानावर जाण्यासाठी सुरुवातीला एक छोटी गल्ली लागते. त्याच्या दोन्ही बाजूला चार चार घरे आहेत. मग मैदानाच्या प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो. मैदानात प्रवेश केल्यावर तो कपिलाषष्ठीचा योग आठवतो. ३६ वर्षांपूर्वी जसे हे मैदान होते, आजही ते तसेच आहे. मैदानाची डावीकडून उजवीकडे असलेली लांबी बघितल्यास ती प्रचंड मोठी आहे, हे लक्षात येते. मैदानाच्या मध्यभागी जाऊन बघितले, तर कपिल यांनी मारलेले षटकार किती दूपर्यंत गेले असतील यांचा अंदाज येतो. मैदानाच्या प्रवेशद्वारावरील एका घराजवळ आम्ही थांबलो. एका वयस्क महिलेने आम्हाला विचारले, ‘‘एक आठवडा लवकर आलात तुम्ही?’’ आमच्या काही लक्षात आले नाही. परंतु नंतर समजले की पुढील आठवडय़ात टनब्रिज वेल्स या गावात बॉलीवूडची मंडळी येणार आहेत. कारण रणवीर सिंगचा कपिल यांच्या जीवनावर आधारित असलेल्या ‘८३’ या चित्रपटाचे चित्रीकरण येथे होणार आहे. त्याच वयस्क महिलेने आम्हाला एक किस्सा सांगितला की, ‘‘मी ज्या घरात राहते, त्याच्या छतावर कपिल यांनी खेचलेल्या षटकाराचा चेंडू पडला

होता. मला हे घर ज्या महिलेने विकले, तिने तो प्रसंग मला रंगवून सांगितला होता.’’ या मैदानातील बाकडय़ांनाही इतिहास आहे. कृष्णम्माचारी श्रीकांतपासून सर्व खेळाडूंनी कपिल यांची ती ऐतिहासिक खेळी याच ठिकाणी बसून बघितली होती. टनब्रिज वेल्स आणि कपिल यांच्यातील नाते ऋणानुबंधाचे आहे. तितके ते मैदानात गेल्यावर कुठेही आढळत नाही, याचीच खंत वाटते. ही भारतीय क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. मैदानामध्ये अनेक छायाचित्रे आहेत. परंतु कपिल यांचे छायाचित्र, बॅट किंवा या आंतराष्ट्रीय सामन्याचा कोठेही उल्लेख येथे केलेला दिसत नाही. आज इतक्या वर्षांत एकच आंतरराष्ट्रीय सामना या मैदानावर झाला आहे. परंतु तरीही तो ठेवा जपल्याचे कुठेच आढळत नाही.

क्रिकेटतज्ज्ञ आणि माजी क्रीडा पत्रकार असे सांगतात, ‘‘ज्या दिवशी हा सामना झाला, त्या दिवशी ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कापरेरेशनचा (बीबीसी) संप होता. मात्र काही लोक सांगतात की, ‘‘असे काहीच घडले नव्हते. कारण भारताची ५ बाद १७ अशी केविलवाणी अवस्था झाली असताना मैदानावर ‘बीबीसी’ने फोन करून विचारणा केली होती की, असे शक्य आहे का? हा सामना लगेच संपू शकेल? परंतु हा सामना झटपट संपला नाही.’’ काहींचे असे म्हणणे आहे ही, ‘‘भारतीय संघ त्या काळात इतका बलाढय़ नव्हता. याशिवाय टनब्रिज वेल्स हे छोटे गाव असल्यामुळे ‘बीबीसी’ने कोणताही तांत्रिक चमू या सामन्याचे चित्रण करण्यासाठी पाठवला नाही.’’ यापैकी कोणाचे खरे आणि कोणाचे खोटे, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.

कपिल यांच्या त्या सामन्याच्या आठवणी लोकांकडून आजही ऐकायला मिळतात. मैदानाच्या आजूबाजूला खूप मोठी घरे आहेत, ज्या घरांवर कपिल यांनी षटकार मारले. त्या घरांची किंमत कमीत कमी १० लाख पौंड म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये आठ कोटी, ७५ लाख, ३२ हजार ५४३ इतकी आहे.