|| ऋषिकेश बामणे

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा १२वा हंगाम आता अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. खेळाडूंच्या गुणवत्तेला आंतरराष्ट्रीय स्तराचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या या स्पर्धेत तिशीपल्याडचे अनुभवी खेळाडू यशस्वी ठरत असतानाच पंचविशीतल्या तरुणांनीसुद्धा दमदार कामगिरी करून स्वत:ची दखल घेण्यास भाग पाडले आहे.

विश्वचषकाच्या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठित स्पर्धामध्ये अनुभवाला नेहमीच प्राधान्य दिले जाते; परंतु काही संघांनी युवा खेळाडूंवर विश्वास दाखवून त्यांना सातत्याने संधी दिली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ याचे उत्तम उदाहरण आहेत. विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच हार्दिक पंडय़ा आणि जसप्रीत बुमरा यांना भारताचे हुकमी एक्के मानले जात होते. प्रत्येकी २५ वर्षांच्या या दोघांनीही आतापर्यंत चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे खेळ केला आहे. मुंबई इंडियन्सला यंदाचे ‘आयपीएल’ विजेतेपद मिळवून देण्यात हार्दिक आणि बुमरा यांनी सर्वोच्च योगदान दिले. चौथ्या-पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येत हार्दिकने सहा सामन्यांत १८७ धावा फटकावल्या असून ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने अनुक्रमे ४८ व ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. सध्याच्या घडीला विश्वातील सवरेत्कृष्ट गोलंदाज म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या बुमराने अफगाणिस्तानविरुद्ध अखेरच्या षटकांत केलेली टिच्चून गोलंदाजी कौतुकास पात्र होती. सहा सामन्यांत १० बळी मिळवणारा बुमरा फलंदाजांवर दडपण आणण्याचे काम चोखपणे बजावत असल्यामुळे दुसऱ्या बाजूने मोहम्मद शमीला बळी मिळवणे सोपे जात आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या दोघांव्यतिरिक्त २४ वर्षीय ‘चायनामन’ फिरकीपटू कुलदीप यादव मोक्याच्या क्षणी संघाला बळी मिळवून देत आहे. पाकिस्तानविरुद्ध कुलदीपने बाबर आझमला त्रिफळाचीत करण्यासाठी टाकलेला चेंडू यंदाच्या विश्वचषकातील सर्वोत्तम चेंडू आहे, असेही म्हटले जात आहे. त्यामुळे स्पर्धेच्या उत्तरार्धातही या तिघांच्या कामगिरीवरच भारताचे भवितव्य ठरेल.

बार्बाडोस येथे जन्मलेला २४ वर्षीय जोफ्रा आर्चर जवळपास वर्षभरापूर्वी इंग्लंडच्या विश्वचषकीय चमूत असेल, असे कोणालाच वाटले नव्हते; परंतु बिग बॅश लीग आणि ‘आयपीएल’मधील चमकदार कामगिरीच्या बळावर आर्चरला थेट विश्वचषकात इंग्लंडचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले. आर्चरने आपने नाणे खणखणीत वाजवताना आठ लढतींमध्ये १६ बळी पटकावून तब्बल पाच सामन्यांत प्रत्येकी तीन बळी मिळवले आहेत. त्याच्याच कामगिरीवर इंग्लंडच्या उपांत्य फेरीच्या आशा टिकून आहेत.

२०१६च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा सवरेत्कृष्ट खेळाडू ठरलेल्या मेहदी हसनने यंदाच्या विश्वचषकात बांगलादेशसाठी बहुमूल्य कामगिरी केली. संघासाठी जेव्हा गरज भासेल तेव्हा ऑफ-स्पिन गोलंदाजी करणाऱ्या हसनने पाच सामन्यांत पाचच बळी मिळवले असले तरी ‘पॉवरप्ले’पासून ते हाणामारीच्या षटकांत त्याने समर्थपणे गोलंदाजी केली. त्याशिवाय २३ वर्षीय मुस्ताफिजूर रहमानने सहा सामन्यांत १० बळी पटकावत स्वत:ची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तर २५ वर्षांच्या लिटन दासने ३ सामन्यांत विंडीजविरुद्धच्या नाबाद ९४ धावांच्या खेळीसह एकूण १३० धावा केल्या आहेत.

पाकिस्तान क्रिकेट संघ म्हणजे डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांची खाण. मोहम्मद आमिर, वहाब रियाज यांसारखे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज संघात असताना १८ वर्षीय शाहीन आफ्रिदीला अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधीसुद्धा मिळेल की नाही, याची शंका होती; परंतु २०१८च्या युवा विश्वचषकात पाकिस्तानतर्फे सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या आफ्रिदीने मिळालेल्या संधीचे सोने करून चार सामन्यांत तब्बल १० गडी गारद केले. फक्त १८ एकदिवसीय सामन्यांचा अनुभव असलेल्या आफ्रिदीने अफगाणिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यांत चार बळी पटकावून पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. आफ्रिदीव्यतिरिक्त १८ वर्षीय मोहम्मद हसनैन हा वेगवान गोलंदाजसुद्धा पाकिस्तानच्या चमूत सहभागी आहे; परंतु त्याला अद्याप एकाही सामन्यात पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करण्याची संधी लाभलेली नाही.

अफगाणिस्तानचा नामांकित फिरकीपटू रशीद खान (२० वर्षे) या वेळी अपयशी ठरला असला तरी, त्याचा सहकारी १७ वर्षीय मुजीब उर रहमानने सहा सामन्यांतील आठ बळींसह संघासाठी भरीव कामगिरी केली आहे. त्याशिवाय वेस्ट इंडिजचा डावखुरा फलंदाज शिम्रॉन हेटमायर, यष्टिरक्षक फलंदाज निकोलस पूरन आणि वेगवान गोलंदाज ओशाने थॉमस या तरुणांनी ठरावीक सामन्यांत आपल्या क्षमतेचे प्रदर्शन घडवले. मात्र या सर्वाच्या योगदानानंतरही विंडीजला साखळी फेरीचा अडथळा ओलांडणे जमले नाही.