|| ऋषिकेश बामणे

चार वर्षांपूर्वी मेलबर्नला झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून दिल्यानंतर कर्णधार मायकल क्लार्कने निवृत्ती पत्करली. त्याच्या निवृत्तीमागे विश्वचषकाची स्वप्नपूर्ती हे कारण होतेच. परंतु वाढत्या वयामुळे मंदावणाऱ्या हालचालींनीसुद्धा त्याची निवृत्ती जवळ आली आहे, हे स्पष्ट दिसत होते. यंदाच्या विश्वचषकानंतरही अनेक खेळाडू निवृत्त झाले आहेत, तर काही लवकरच निवृत्तीची घोषणा करण्याच्या उंबरठय़ावर आहेत. परंतु या सर्व खेळाडूंची एकत्र मोट बांधूनही सर्वोत्कृष्ट ‘निवृत्त एकादश’ संघ तयार होऊ शकतो.

महेंद्रसिंह धोनी (कर्णधार व यष्टीरक्षक)

भारतीय क्रिकेटला सर्वोच्च यश मिळवून देणारा महानायक म्हणजे महेंद्रसिंह धोनी. ३८ वर्षीय धोनीने भारताला अनेकदा बिकट परिस्थितीतून विजयाची दिशा दाखवली. परंतु न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात तो भारताला विजयी करण्यात अपयशी ठरला. विश्वचषकातील नऊ सामन्यांत दोन अर्धशतकांसह धोनीने २७३ धावा केल्या. २०२३च्या विश्वचषकापर्यंत धोनीचे वय ४२ झाले असेल. त्यामुळे त्याच्या सध्याच्या खेळाकडे पाहता तो आणखी चार वर्षे खेळणे कठीण वाटते. मात्र ‘निवृत्त एकादश’चे नेतृत्व व यष्टीरक्षण अशी दुहेरी भूमिका सांभाळण्यासाठी धोनीशिवाय दुसरा अचूक पर्याय असू शकत नाही.

ख्रिस गेल

वेस्ट इंडिजचा ३९ वर्षीय स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने हा कारकीर्दीतील अखेरचा विश्वचषक असेल, हे स्पष्ट केले होते. गेलने विश्वचषकात दोन अर्धशतकांसह २४२ धावा केल्या. परंतु विंडीजचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले.

हशिम अमला

दक्षिण आफ्रिकेच्या ३६ वर्षीय हशिम अमलाची तंत्रशुद्ध फलंदाजी म्हणजे दर्दी क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी. परंतु गेल्या काही वर्षांपासून अमलाचा सूर हरवला असून या विश्वचषकात त्याला सात सामन्यांत फक्त २०३ धावा करता आल्या. त्यामुळे अमलासुद्धा पुढील विश्वचषकात नसेल.

रॉस टेलर

न्यूझीलंडच्या स्वप्नवत वाटचालीत कर्णधार केन विल्यम्सनइतकेच १० सामन्यांत तीन अर्धशतकांसह ३५० धावा करणाऱ्या रॉस टेलरचेसुद्धा महत्त्वपूर्ण योगदान आहे. २२८ सामन्यांचा अनुभव असलेला टेलर पुढील विश्वचषकापर्यंत ३९ वर्षांचा असेल.

जेपी डय़ुमिनी

दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा अष्टपैलू खेळाडू जेपी डय़ुमिनीने या विश्वचषकातील पाच लढतींमध्ये फक्त ७० धावा केल्या. त्यामुळे त्याला संघातून वगळण्यातसुद्धा आले. साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध कारकीर्दीतील अखेरचा सामना खेळून त्याने ३५व्या वर्षी क्रिकेटला रामराम ठोकला.

मोहम्मद हफीझ

पाकिस्तानचा ३८ वर्षीय मोहम्मद हफीझ या विश्वचषकात बहुतांश वेळा कामचलाऊ गोलंदाजांद्वारे बाद झाला. त्यामुळेच त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. इंग्लंडविरुद्धच्या विजयात झळकावलेले एकमेव अर्धशतक वगळल्यास त्याने आठ लढतींत २५३ धावा केल्या. त्यामुळे पुढील विश्वचषकापर्यंत हफीझने निवृत्ती पत्करलेली असेल, याचीच सर्वाधिक शक्यता आहे.

शोएब मलिक

१९९९मध्ये पदार्पण करणाऱ्या शोएब मलिकने गेली २० वर्षे पाकिस्तान क्रिकेटसाठी सातत्याने योगदान दिले. परंतु यंदाच्या विश्वचषकात त्याला सुमार कामगिरीमुळे फक्त तीन सामन्यांत संधी मिळाली. त्यामध्येही फक्त आठच धावा मलिकला करता आल्या. त्यामुळे ३७ वर्षीय मलिकने विश्वचषकातील पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आल्यावर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला.

इम्रान ताहीर

बाद झालेला फलंदाज कोणताही असो, परंतु तितक्याच जोश आणि उत्साहाने संपूर्ण मैदानभर हात वरती करून धावत आनंद साजरा करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या ४० वर्षीय इम्रान ताहीरचा हा अखेरचा विश्वचषक होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या लढतीत त्याला एकच बळी मिळवता आला असला तरी त्याच्या दर्जेदार फिरकीने यंदाच्या विश्वचषकात १२ फलंदाजांना शिकार बनवले.

लसिथ मलिंगा

३५ वर्षीय लसिथ मलिंगाने कारकीर्दीतील अखेरच्या विश्वचषकात श्रीलंकेसाठी सर्वतोपरी योगदान दिले. परंतु सात सामन्यांत त्याने मिळवलेले ११ बळी श्रीलंकेला उपांत्य फेरीत प्रवेश करून देण्यात कमी पडले. मात्र २२५ सामन्यांत ३३५ बळी मिळवणाऱ्या मलिंगाने आपली छाप पाडली.

मश्रफी मोर्तझा

बांगलादेशच्या ३५ वर्षीय मश्रफी मोर्तझाने कर्णधार म्हणून या विश्वचषकात चांगली कामगिरी केली असली तरी गोलंदाजीत त्याला फक्त एक बळी मिळवता आला. स्वत: मोर्तझाने आपण निवृत्तीच्या विचारात असल्याचे सांगितल्यामुळे पुढील विश्वचषकापर्यंत तो संघात नसेल, हे पक्के झाले आहे.

वहाब रियाझ

वेगवान गोलंदाज वहाब रियाझने या विश्वचषकात आठ सामन्यांत ११ बळी मिळवले. परंतु पाकिस्तानकडे दुसरी दर्जेदार वेगवान गोलंदाजांची फळी तयार आहे. त्याशिवाय बऱ्याच वेळा दुखापतीमुळे ३४ वर्षीय वहाबला अनेक स्पर्धाना मुकावेसुद्धा लागले आहे. म्हणूनच पुढील विश्वचषकात वहाब पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणे कठीणच वाटते.