भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघांसारखे अनेक नामांकित खेळाडू न्यूझीलंडच्या संघात क्वचितच आढळतील. मात्र तरीही सांघिक कामगिरीच्या बळावर गेल्या पाच विश्वचषकापासून हा संघ सहजपणे किमान उपांत्य फेरी गाठत आहे. आतापर्यंत एकदाही त्यांना जगज्जेतेपदाची चव चाखता आली नसली तरी २०१५मध्ये मिळवलेले उपविजेतेपद त्यांना नक्कीच या विश्वचषकात प्रेरणादायी ठरेल. विश्वचषकाच्या प्रबळ दावेदारांमध्येही न्यूझीलंडला नेहमीच तिसरा किंवा चौथा क्रमांक लाभतो. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या किवींच्या संघात कोणत्याही संघाला धूळ चारण्याची क्षमता आहे. मार्टिन क्रो, रिचर्ड हॅडलीपासून ते स्टीफन फ्लेमिंग, ब्रँडन मॅक्क्युलम असे मातब्बर खेळाडू घडवणाऱ्या न्यूझीलंडला ‘ब्लॅक कॅप्स’ आणि ‘किवी’ यांसारख्या विविध नावांनी संबोधले जाते. गुणी आणि शिस्तप्रिय खेळाडूंचा भरणा असलेल्या न्यूझीलंडने यंदा नेहमीच्या शांत स्वभावाच्या चाकोरीपलीकडे खेळ करत आक्रमक खेळावर भर दिला, तर १४ जुलै रोजी ते नक्कीच विश्वचषक उंचावू शकतात.

अपेक्षित कामगिरी

इंग्लंडच्या खेळपट्टय़ांना साजेशी वेगवान गोलंदाजांची फळी आणि अष्टपैलू खेळाडूंचे विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे न्यूझीलंडचे पुन्हा एकदा उपांत्य फेरीतील स्थान निश्चित मानले जात आहे. यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांकडून त्यांना कडवी झुंज मिळू शकते. महत्त्वाच्या सामन्यांत खेळ उंचावण्यात न्यूझीलंडचे खेळाडू यशस्वी ठरल्यास यंदा त्यांना रोखणे कठीण जाईल.

बलस्थाने आणि कच्चे दुवे

यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये न्यूझीलंडच्या खेळाडूंना फारशी चमक दाखवता आली नाही. त्याशिवाय वर्षांच्या सुरुवातीला भारताविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेतही त्यांना १-४ असा पराभव पत्करावा लागला. परंतु कर्णधार विल्यम्सन, रॉस टेलर या फलंदाजांची, तर ट्रेंट बोल्ट आण टीम साऊदी या अनुभवी गोलंदाजांची जोडी न्यूझीलंडसाठी सुवर्णाध्याय लिहू शकते. त्याशिवाय एकही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना न खेळलेल्या टॉम ब्लंडेलच्या फलंदाजीविषयी इतर संघांना कल्पना नसल्यामुळे तो विश्वचषकात धमाल करू शकतो. मात्र कॉलिन डी’ग्रँडहोम व जेम्स निशाम या अष्टपैलूंना कामगिरी सुधारण्याची आवश्यकता असून इंग्लंडच्या खेळपट्टीवर मिचेल सँटनर व इश सोधी (१२ सामन्यांत १६ बळी) ही फिरकीची जोडी अपयशी ठरल्याने न्यूझीलंडला मोठा फटका पडू शकतो.

संकलन : ऋषिकेश बामणे