भारतीय संघाचा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारलेल्या न्यूझीलंड संघातील आघाडीच्या खेळाडूनं भारतीय क्रीडा चाहत्यांना खास आवाहन केलं आहे. भारतीय संघाची विश्वचषकातील कामगिरी पाहता असे वाटले होते की विराट अॅण्ड कंपनी संहच अंतिम फेरीत पोहचेल. त्यामुळे अनेक भारतीय चाहत्यांनी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याची तिकिटे विकत घेतली होती. मात्र, उपांत्य सामन्यात भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यामुळे अंतिम सामन्याबाबत भारतीयांना कोणतीही उत्सुकता राहिलेली नाही. त्यामुळेच न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज जिमी नीशमने भारतीयांना खास आवाहनकेलं आहे. भारतीय चाहत्यांना अंतिम फेरीचा सामना पहायचा नसेल त्यांनी अधिकृतपणे तिकिट न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या क्रीडा चाहत्यांना विकण्याचे आवाहन नीशमने केले आहे.

हजारो भारतीयांनी अंतिम सामन्याची तिकिटं खरेदी केल्यामुळे आता इंग्लंड व न्यूझीलंडच्या चाहत्यांना तिकिटे मिळवण्यात अडचणी येत आहेत. दोन्ही संघाच्या चाहत्यांना अंतिम सामन्याचे तिकीट अव्वाचे सव्वा दराने खरेदी करावे लागत आहे. काहींनी दुपट्ट किंवा तिप्पट रक्कम देत ब्लॅकने तिकिट खरेदी केलं आहे. याचीच दखल घेत न्यूझीलंडच्या नीशमने भारतीय चाहत्यांना आवाहन केले आहे. नीशमने ट्विट करत भारतीयांना आवाहन केलं आहे.

दरम्यान, रविवारी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या गौरवशाली इतिहासात नव्या विश्वविजेत्याचा अध्याय सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणार आहे. यजमान इंग्लंडला तीनदा आणि न्यूझीलंडला एकदा विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली आहे. परंतु यंदा १२व्या विश्वचषकावर ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका या पाच राष्ट्रांव्यतिरिक्त नवा जगज्जेता नाव कोरणार आहे.