विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानच्या संघासाठी उर्वरित सर्व सामने हे करो या मरो स्वरूपाचे आहेत. त्यामुळे पाकिस्तानला न्यूझीलंड विरुद्ध विजय आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंड विरुद्ध दमदार सुरुवात केली. त्यातच यष्टीरक्षक-कर्णधार असलेला सर्फराज अहमद याने एक भन्नाट झेल टिपत पाकचे मनोधैर्य उंचावले.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडची सुरुवात अत्यंत खराब झाली. दुसऱ्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर मार्टिन गप्टिल त्रिफळाचीत झाला. मोहम्मद आमिरच्या गोलंदाजीवर फटका खेळताना चेंडू बॅटला लागून यष्ट्यांवर आदळला आणि तो माघारी परतला. त्या पाठोपाठ कॉलिन मुनरोदेखील १२ धावांवर बाद झाला. केन विल्यमसन आणि रॉस टेलर हे दोन २ अनुभवी खेळाडू मैदान सांभाळतील अशी आशा न्यूझीलंडला होती. पण तशातच रॉस टेलरच्या उत्कृष्ट झेल टिपत सर्फराजने त्याला तंबूत धाडले.

नवव्या षटकात शाहिद आफ्रिदीने आऊट स्विंग होणारा चेंडू टाकला. त्या चेंडूला दिशा देण्याच्या उद्देशाने टेलरने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागला आणि चेंडू यष्टीरक्षक आणि स्लिप यांच्या दिशेने जाऊ लागला. त्यावेळी यष्टिरक्षक सर्फराजने अत्यंत चपळाईने उडी मारत तो चेंडू झेलला. चेंडू वेगात असताना त्याने भन्नाट झेल टिपला.

टेलरने ८ चेंडूत केवळ ३ धावा केल्या. तर त्यानंतर टॉम लॅथम हा देखील १४ चेंडूत १ धाव काढून सर्फराजकडे झेल देऊन माघारी परतला. त्यामुळे १३ व्या षटकात न्यूझीलंडची अवस्था ४ बाद ४६ अशी झाली होती.