सलामीवीर ख्रिस गेलच्या धडाकेबाज अर्धशतकी खेळीच्या जोरावर विंडिजने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर ७ गडी राखून मात केली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेलं १०६ धावांचं आव्हान विंडिजच्या फलंदाजांनी अवघ्या १४ षटकांमध्ये पूर्ण केलं. ख्रिस गेलने पाकच्या गोलंदाजांचा समाचार घेत ३४ चेंडूत ५० धावा केल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. ख्रिस गेलला निकोलस पूरनने चांगली साथ दिली. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिरने ३ फलंदाजांना माघारी धाडलं, मात्र कमी धावसंख्येमुळे विंडिजच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचं काम तो करु शकला नाही.

त्याआधी, २०१९ विश्वचषकाचा पहिला सामना खेळणाऱ्या पाकिस्तानला चांगलाच धक्का बसला. विंडिजच्या गोलंदाजीचा सामना करताना पाकिस्तानचा संघ अवघ्या १०५ धावांमध्ये माघारी परतला. विंडिजकडून ओश्ने थॉमसने ४, कर्णधार जेसन होल्डरने ३, आंद्रे रसेलने २ आणि शेल्डन कोट्रेलने १ बळी घेतला.

अवश्य वाचा – Cricket World Cup 2019 : युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेल ठरला षटकारांचा बादशहा

नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा जेसन होल्डरचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कोट्रेलने इमाम उल-हकला माघारी धाडत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. यानंतर पाकिस्तानच्या डावाला गळतीच लागली. विंडिजच्या गोलंदाजांनी उसळत्या चेंडूचा मारा करत पाक फलंदाजांना नाकीनऊ आणले. फखार झमान आणि बाबर आझमने थोडाफार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे प्रयत्न तोकडे पडले.

ओश्ने थॉमस, जेसन होल्डर आणि आंद्रे रसेल यांनी पाकिस्तानची मधली फळी कापून काढत सामन्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. एका क्षणाला पाकिस्तानचा संघ १०० धावांचा टप्पा ओलांडतो की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र अखेरच्या फळीत वहाब रियाझने फटकेबाजी करत संघाला १०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.