28 September 2020

News Flash

विश्वचषक कवी संमेलन

इंग्लंडमध्ये सुरू असलेला विश्वचषक सध्या साऱ्या जगाच्याच आकर्षणाचा विषय आहे.

|| संतोष सावंत

इंग्लंडमध्ये सुरू असलेला विश्वचषक सध्या साऱ्या जगाच्याच आकर्षणाचा विषय आहे. विश्वचषकाच्या रंगतदार लढतींसोबतच या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या विशेष कार्यक्रमांकडेही जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलेले असते. अशाच एका खास कार्यक्रमाचे आयोजन दस्तुरखुद्द राणीसाहेबांनी नुकतेच खास निमंत्रितांसाठी केले होते म्हणतात. देशोदेशीच्या कवींनी खास शैलीत येथे आपल्या कविता सादर केल्या. थेम्स नदीच्या काठी, लंडन ब्रिजच्या सान्निध्यात पहाटेपर्यंत रंगलेल्या काव्याच्या या तरल भावाविष्काराला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

या काव्य मैफिलीची सुरुवात पारंपरिक अफगाणी पेहरावातील कवीने आपल्या भावपूर्ण कवितेने केली.

ओळखलंत का सर मला, मैदानात आला कोणी..

कपडे होते लालनिळे, केसांवरती तेलपाणी! ॥धृ.॥

क्षणभर बॅटिंग, नंतर बॉलिंग, चेंडूही झेलले पाहुनी

विजयश्री ठरते पाहुणी, विचार येती राहुनी राहुनी! ॥१॥

या दमदार सादरीकरणानंतर दक्षिण आफ्रिकेच्या एका कवीने धावतच मंचावर प्रवेश केला. याच्या चेहऱ्यावरील ओसंडून वाहणारा आनंद सर्वाच्याच औत्सुक्याचा विषय ठरला.

आनंदी आनंद गडे! ताहिरला जेव्हा विकेट मिळे

बाहू पसरुनी पळत सुटे, वायूसंगे ताहिर फिरे ॥धृ.॥

अचूक पडला, चेंडूही फिरला, फलंदाज चकला

ताहिर विहरतो चोहिंकडे, आनंदी आनंद गडे! ॥१॥

विकेट मिळाल्यावर मैदानावर उधाणलेला इम्रान ताहिर कवीने प्रेक्षकांच्या डोळ्यांसमोर उभा केला आणि या कवितेला त्यांनी भरभरून दाद दिली. यानंतर एका बांगलादेशी कवीने व्यासपीठावर प्रवेश केला.

क्रिकेट खेळावं वाघासारखं हृदयामध्ये रुजलेलं

गल्लीमध्ये उगवूनसुद्धा विश्वचषकापर्यंत पोचलेलं..

या लहानशा परंतु भावगर्भ कवितेने प्रेक्षकांची शाबासकी मिळवली. यानंतर यजमान इंग्लंडचा कवी मंचावर आला त्याने वाकून राणीसाहेबांना सलाम केला आणि तमाम इंग्लंडवासीयांची व्यथा आपल्या कवितेतून मांडली.

पाहिले न मी तुला, हातही न लाविले

ना कळे कधी कसे, मम स्वप्न भंगले ॥धृ.॥

चमचमती सोनेरी कांती तव पाहुनी

क्रिकेटसंघ जगातले हरखले मनातुनी

उचलण्या विश्वकप मन हे आसुसले

ना कळे कधी कसे, मम स्वप्न भंगले ॥१॥

या सादरीकरणानंतर राणीसाहेबांनी गुपचूप आपले डोळे पुसल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेत धोनी असेल का? या विचाराने व्याकूळ झालेल्या भारतीय कवीने यानंतर आपली कविता सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.

नसतोस मैदानी तू जेव्हा

जीव हळवा हळवा होतो

हॅलिकॉप्टर टेक-ऑफ न घेते

धावांचा ओघही सरतो ॥धृ.॥

सारे वीर धारातीर्थी

कल्लोळ तसा ओढवतो

मग तुझी आठवण होते

अन् संघच पोरका होतो ॥१॥

जागतिक कीर्तीच्या अनेक खेळाडूंचा हा कदाचित शेवटचा विश्वचषक असेल या विचाराने वातावरण हळवे झाले. परंतु नंतर मंचावर आलेल्या कॅरेबियन बेटावरील कवीने धमाल उडवली आणि वातावरण पुन्हा एकदा हलकेफुलके झाले.

याने फटकेबाजी केली किंवा त्याने फटकेबाजी केली

करू दे की मला सांगा तुमचं काय गेलं? ॥धृ.॥

हा गोलंदाजांना पहिल्या बॉलपासून भिडला

आणि अध्र्या पिचवर जाऊन त्याने सिक्सर मारला

अहो भिडला तर भिडू दे की मारला तर मारू दे की

तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं ॥१॥

वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल, आंद्रे रसेल यांच्यासारख्या धडाकेबाज फलंदाजांच्या शैलीबाबत तक्रार करणाऱ्यांना त्याने आपल्या या कवितेतून चोख उत्तर दिले.

या रंगलेल्या काव्य मैफिलीची सांगता पाकिस्तानी कवीच्या कव्वालीने झाली.

भर दो झोली मेरी या मोहोम्मद

लौटकर मैं ना जाऊंगा खाली..

देश, धर्म, पंथ हे भेदभाव बाजूला सारत

आणि क्रिकेटजगतातील वैरही बाजूला ठेवत

सर्वच देशांच्या खेळाडूंनी या गाण्यावर ठेका

धरला. थेम्स नदीचा परिसर सूफी संगीतात न्हाऊन निघाला.

(या लेखात विडंबनासाठी उपयोगात आणलेल्या रचना आणि त्यांचे रचनाकार महान असून त्यांना दुखावण्याचा हेतू नाही.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 8:04 am

Web Title: icc cricket world cup 2019 poetry conferences 2019
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : भारतीय क्रिकेटच्या ‘दादा’ला मागे टाकत रोहित शर्माचा भीमपराक्रम !
2 World Cup 2019 : युजवेंद्र चहल विश्वचषक इतिहासातला भारताचा सर्वोत्तम गोलंदाज
3 Cricket World Cup 2019 : अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड विजयी, बांगलादेशची झुंज अपयशी
Just Now!
X