आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे स्पष्टीकरण

पावसामुळे यंदाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील तीन सामने वाया गेले आहेत. परंतु इंग्लंडमधील सध्याच्या वातावरणाशी सामना करण्याचा कोणताही पर्यायी मार्ग नाही. प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवस ठेवणे हे अशक्य असल्याचे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) व्यक्त केले आहे.

ब्रिस्टल येथील श्रीलंकेचे अनुक्रमे पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धचे सामने एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. साऊदम्पटन येथील दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मंगळवारचा सामना ७.३ षटकांच्या खेळानंतर रद्द करण्यात आला. आता गुरुवारी नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यावर मुसळधार पावसाचे सावट आहे.

‘‘सामने नियोजित दिवशी झाले नाहीत, तर प्रत्येक सामन्यासाठी राखीव दिवसाची तरतूद करणे, दीर्घकाळ वेळापत्रकात व्यावहारिकदृष्टय़ा कठीण आहे,’’ असे ‘आयसीसी’चे मावळते मुख्य अधिकारी डेव्ह रिचर्ड्सन यांनी स्पष्ट केले आहे.

‘‘सध्याचे येथील हवामान हे अत्यंत अनपेक्षित आहे. जून महिन्यात इंग्लंडमध्ये जाणवणाऱ्या सरासरी मासिक पावसापेक्षा अधिक सरींची नोंद गेल्या दोन दिवसांत झाली आहे. २०१८च्या जूनमध्ये सरासरी दोन मिमी पावसाची नोंद दाखवत आहे. मात्र गेल्या २४ तासांत १०० मिमी पाऊस इंग्लंडच्या दक्षिण-पूर्व भांगांत पडला आहे,’’ असे रिचर्ड्सन यांनी सांगितले.

‘‘राखीव दिवसांना वेळापत्रकात स्थान दिल्यास खेळपट्टीची तयारी, संघबांधणी, प्रवासाचे दिवस, निवास व्यवस्था, स्टेडियम उपलब्धता, स्पर्धेसाठीचे कर्मचारी, स्वयंसेवक, सामनाधिकारी, प्रक्षेपण यंत्रणा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेक्षक या घटकांवर परिणाम होऊ शकेल. परंतु राखीव दिवससुद्धा ‘पाऊसमुक्त’ राहू शकेल, याची खात्री देता येत नाही,’’ असे रिचर्ड्सन स्पष्टीकरण रिचर्ड्सन यांनी दिले.

सामने रद्द झाल्यामुळे गुणतालिकेतील संघांच्या गुणसंख्येवर गंभीर परिणाम दिसून येईल. परंतु प्रत्येक सामना यशस्वी करण्यासाठी १२०० कर्मचारी कार्यरत असतात. जेव्हा एखाद्या सामन्यावर हवामानाचा परिणाम जाणवतो. तेव्हा स्टेडियममधील कार्यरत सर्व घटक षटके कमी करून तरी सामना खेळवता येईल का, यासाठी गांभीर्याने प्रयत्न करतात. त्यामुळे वेळापत्रकात राखीव सामन्यांची भर पडल्यास कर्मचारी संख्याही वाढवावी लागेल, याकडे रिचर्ड्सन यांनी लक्ष वेधले.

‘‘प्राथमिक टप्प्यातील ४५ सामन्यांपैकी बहुतांश सामने व्हावेत अशी अपेक्षा आहे. मात्र बाद फेरीच्या सामन्यांसाठी राखीव दिवसाची तरतूद आहे,’’ असे रिचर्ड्सन म्हणाले.

आम्ही दोन गुणांसाठी सामना खेळतो. कोणत्याही खेळाडूला सामना पावसामुळे वाया जावा, असे व्यक्तिश: वाटत नाही.     – लॉकी फर्ग्युसन, न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात आमचे दोन गुणांचे लक्ष्य होते; परंतु पावसामुळे आम्हाला एक गुण गमवावा लागला, हे अत्यंत निराशाजनक आहे. याबाबत आपण काहीच करू शकत नाही.     – स्टीव्ह ऱ्होड्स, बांगलादेशचे प्रशिक्षक

पावसाचा फटका बसल्याने षटके कमी करावी लागली असती, तर ट्वेन्टी-२० सामना खेळण्याची पाळी आली असती. तीन सामने आधीच गमावले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत श्रीलंकेची विजयाची संधी वाढली असती.         – फॅफ डय़ू प्लेसिस, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

रद्द झालेले सामने

  • ७ जून, ब्रिस्टलश्रीलंका-पाकिस्तान
  • १० जून, साऊदम्पटन – दक्षिण आफ्रिका-वेस्ट इंडिज
  • ११ जून, ब्रिस्टल – श्रीलंका-बांगलादेश