२०१९ विश्वचषक स्पर्धेत पहिल्या धावात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माने, ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या सामन्यात आपली चमक दाखवली आहे. अवघ्या २० धावा काढून झाल्यानंतर रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वात जलद २ हजार धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या स्थानावर पोहचला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना सुरु होण्याआधी रोहितच्या नावावर १९८० धावा जमा होत्या.  २ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला अवघ्या २० धावा हव्या होत्या. ही औपचारिकता पूर्ण करत रोहितने अखेरीस मानाच्या यादीत पहिलं स्थान पटकावलं आहे.

यादरम्यान रोहितने सचिन तेंडूलकर, सर व्हिवीअन रिचर्ड्स यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा विक्रम मोडीत काढला आहे. रोहितने ३८ डावांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. या तुलनेत सर व्हिवीअन रिचर्ड्स यांनी ४५, डेस्मन हेन्स यांनी ५९ तर सचिन तेंडुलकर यांनी ५१ डावांत २ हजार धावांचा टप्पा ओलांडला होता.