भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांपुढे भारतीय संघाच्या फलंदाजांना फारशी मजल मारता आली नाही. कर्णधार विराट कोहली आणि केदार जाधव यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ५० षटकात २२४ धावा केल्या आणि अफगाणिस्तानला २२५ धावांचे आव्हान दिले.

२२५ धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना डावखुरा फलंदाज हजरतुल्लाह त्रिफळाचीत झाला. जायबंदी भुवनेश्वर कुमारच्या जागी संघात स्थान मिळालेल्या मोहम्मद शमीने त्याला बाद केले. हजरतुल्लाहने २४ चेंडूत १० धावा केल्या. पाठोपाठ हार्दिक पांड्याने टाकलेल्या बाउन्सर चेंडूवर गुलबदिन झेलबाद झाला. त्याने ४२ चेंडूत २ चौकारांसह २७ धावा केल्या. ४२ धावांची आश्वासक भागीदारी करणारे अफगाणिस्तानचे दोनही फलंदाज बुमराहच्या निर्धाव षटकात बाद झाले. चौथ्या चेंडूवर रहमत शाह ३६ धावांवर बाद झाला. तर शेवटच्या चेंडूवर हाशमतुल्लाह शाहिदी बुमराहकडेच झेल देऊन २१ धावांवर माघारी गेला. बुमराहने स्वतःच्या फॉलो-थ्रूमध्ये धावत जाऊन पुढे झुकत हा सुंदर झेल टिपला.

हा पहा व्हिडीओ –

त्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना स्पर्धेत दोन शतके ठोकणारा रोहित शर्मा अफगाणिस्तानविरुद्ध स्वस्तात माघारी परतला. मुजीब उर रहमानने त्याला त्रिफळाचीत करत एका धावेवर माघारी धाडले आणि भारताला पहिला धक्का दिला. रोहित शर्मा लवकर बाद झाल्यावर सलामीवीर लोकेश राहुल आणि कर्णधार विराट कोहली यांनी सावध फलंदाजी करत अर्धशतकी भागीदारी केली. सलामीवीर लोकेश राहुल याने चांगली खेळी केली पण रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला. त्याने ३० धावा केल्या. या दरम्यान दमदार कामगिरी करत कर्णधार विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक झळकावले.

चांगली सुरुवात मिळल्यानंतर मोठी धावसंख्या उभारण्यात विजय शंकर अपयशी ठरला. ४१ चेंडूत २९ धावा करून तो रहमत शाहच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. दमदार अर्धशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली ६३ चेंडूत ६७ धावा करून माघारी गेला. विराटने ५ चौकार लगावले. मोहम्मद नबीला दुसरा बळी मिळाला. त्यानंतर महेंद्रसिंग धोनी आणि केदार जाधव यांनी अत्यंत संथ खेळी केली. शेवटच्या टप्प्यात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात धोनी माघारी परतला. धोनीने ३ चौकारांसह ५२ चेंडूत २८ धावा केल्या. केदार जाधवने संयमी अर्धशतक केले. पण तो देखील ६८ चेंडूत ५२ धावा काढून बाद झाला.