भारतीय संघ उपांत्य फेरीत न्यूझीलंडकडून पराभूत झाला. २४० धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजांना केवळ २२१ धावत करता आल्या. महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जाडेजा या दोन खेळाडूंशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने जबाबदारीने खेळ केला नाही. त्यानंतर टीम इंडियामध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता रोहित शर्मा संघाला सोडून आपली पत्नी रितिका आणि मुलगी समायरा हिच्यासमवेत मुंबईत दाखल झाल्याचाही एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसताना दिसत आहे. बाजूच्या सीटवर रोहितची पत्नी रितिका मुलगी समायरा हिला मांडीवर घेऊन बसली आहे. विरल भयानी याने हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला असून त्यात त्याने ‘घरी परतताना रोहितने कारमध्ये थेट ड्रायव्हिंग सिटचा ताबा घेतला’, असे कॅप्शन दिले आहे.

Video –

 

View this post on Instagram

 

#rohitsharma takes the drivers seat as he heads back home #viralbhayani @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

काय आहे वादाचे प्रकरण?

उपांत्य फेरीतील पराभवानंतर टीम इंडियात सूत्रांच्या माहितीनुसार दोन गट पडले आहेत. भारतीय संघातील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघ सध्या दोन गटांमध्ये विभागला गेला आहे. ‘Times Now’ या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात, ज्यामुळे संघात गोंधळाचं वातावरण निर्माण होतं. विश्वचषकाचा संघ जाहीर होण्यापूर्वी अंबाती रायुडूऐवजी विजय शंकरला संघात स्थान देण्यावरुनही असाच गोंधळ निर्माण झाल्याचं खेळाडूने स्पष्ट केलं आहे.

क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. याच कारणामुळे प्रक्षिक्षक अनिल कुंबळे यांच्याशी झालेला वाद, आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती. खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या गटातील खेळाडूंना भारतीय संघात जागा मिळते. लोकेश राहुलची कामगिरी कितीही खराब असली तरीही त्याचा सलामीवीर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी नेहमी विचार केला जातो. नाहीतर किमान १५ जणांच्या संघात तरी राहुल आपलं स्थान टिकवतोच. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघात असल्याचा आरोप खेळाडूने केला आहे.

अंबाती रायुडूला भारतीय संघात जागा न मिळण्यामागेही संघ व्यवस्थापनाचा हात असल्याचा आरोप या खेळाडूने केला आहे. याचसोबत टीम इंडियातले काही खेळाडू हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कामगिरीवर खुश नसल्याचंही समजत आहे.