इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव ४९ षटकात २२३ धावांत आटोपला. स्टीव्ह स्मिथने ८५ धावांची झुंजार खेळी केली. त्याला अलेक्स कॅरी (४६) आणि मिचेल स्टार्क (२९) यांनी चांगली साथ दिली. पण इंग्लंडच्या भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाला केवळ २२३ धावाच करता आल्या. त्यातही स्टीव्ह स्मिथ याने एकाकी झुंज दिली, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला द्विशतकी मजल मारता आली. पण बाद होण्याच्या बाबतीत मात्र स्मिथ अत्यंत दुर्दैवी ठरला.

४७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर स्मिथ ८५ धावांवर खेळत होता. वोक्सने पहिला चेंडू बाउन्सर टाकला. तो चेंडू स्मिथने मागच्या बाजूला टोलवला आणि एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न केला. पण या बाबतीत स्मिथ अत्यंत दुर्दैवी ठरला. यष्टीरक्षक जोस बटलरने हाती आलेला चेंडू थेट स्टंपवर फेकला. महत्वाचे म्हणजे यावेळी चेंडू स्मिथच्या दोन पायांच्या मधून चेंडू गेला आणि स्टंपवर आदळला. तिसऱ्या पंचानी याबाबत अंतिम निर्णय दिला आणि त्यात त्याला बाद ठरवण्यात आले.

हा पहा व्हिडीओ –

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिंच याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय स्वीकारला. जोफ्रा आर्चरच्या पहिल्याच चेंडूवर कर्णधार फिंच शून्यावर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का बसला. पंचांच्या निर्णयावर फिंचने रिव्ह्यू घेतला मात्र तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. ऑस्ट्रेलियाकडून दमदार कामगिरी करणारा डेव्हिड वॉर्नर आजच्या सामन्यात लौकिकाला साजेसा खेळ करू शकला नाही. तो २ चौकार लगावून ९ धावांवर बाद झाला. नवखा पीटर हँड्सकॉम्ब १२ चेंडूत ४ धावा काढून माघारी परतला. वोक्सने त्याला त्रिफळाचित केले.

१४ धावांवर ३ गडी गमावलेल्या ऑस्ट्रेलियाला स्टीव्ह स्मिथ आणि अलेक्स कॅरी यांनी सावरले. या दोघांनी अत्यंत सावध खेळी करत १४ व्या षटकात संघाला पन्नाशी गाठून दिली. स्मिथच्या साथीने अलेक्स कॅरीने चांगली भागीदारी केली. पण अर्धशतकाच्या जवळ पोहोचल्यावर कॅरी झेलबाद झाला. ७० चेंडूत ४ चौकारांसह ४६ धावा केल्या. कॅरी पाठोपाठ मार्कस स्टॉयनीस आदिल रशिदच्या फिरकीचा शिकार ठरला. २ चेंडूत तो शून्यावर पायचीत झाला. ऑस्ट्रेलियाचा डाव गडगडत असताना स्टीव्ह स्मिथने झुंजार खेळी करत ७२ चेंडूत अर्धशतकी खेळी केली. फटकेबाज खेळी करण्याच्या प्रयत्नात मॅक्सवेल झेलबाद झाला. २ चौकार आणि १ षटकार खेचत २३ चेंडूत २२ धावांवर तो माघारी परतला. अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स स्वस्तात माघारी परतला. त्याने १० चेंडूत ६ धावा केल्या. एकीकडे गडी बाद होताना स्टीव्ह स्मिथने झुंजार ८५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार लगावले. पण चोरटी धाव घेताना स्मिथ धावबाद झाला. पाठोपाठ मिचेल स्टार्कदेखील २९ धावा काढून माघारी परतला.