|| चंद्रकांत पंडित

क्रिकेटमध्ये अनेक इतिहास घडले आहेत. इतिहासाची पुनरावृत्तीदेखील होऊ शकते आणि एक नवा इतिहास लिहिलाही जाऊ शकतो. चेतन शर्माने १९८७च्या विश्वचषकात हॅट्ट्रिक घेण्याची किमया साधली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती यंदाच्या विश्वचषकात मोहम्मद शमीने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात केली.

बांगलादेशने भारताला २००७च्या विश्वचषकात नमवले होते. त्यामुळे एक गोष्ट लक्षात येते की, नवे संघ नव्या गोष्टी शिकतात आणि त्यांच्या आत्मविश्वास वाढल्यानंतर ते चांगल्या चांगल्या संघांना धडे शिकवतात. अफगाणिस्तान हा संघ जागतिक क्रिकेटमध्ये तसा नवा असला तरी त्यांच्या खेळामध्ये झालेल्या सुधारणांचा प्रत्यय आपल्याला भारत-अफगाणिस्तान सामन्यात दिसून आला. अफगाणिस्तानचे अनेक खेळाडू इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आणि अनेक उच्च दर्जाचे सामने सध्या खेळत असल्यामुळे त्यांच्या गाठीशी अनेक चांगले अनुभव आले आहेत. परंतु सातत्याने आंतराष्ट्रीय सामने खेळण्याची संधी या संघाला मिळत नसल्याने त्यांना आपल्या खेळात चांगली सुधारणा करता आली नाही, हे या सामन्याने अधोरेखित केले.

भारतासारख्या नामवंत संघाला २२४ धावांमध्ये रोखणे या विश्वचषकात अद्याप कोणत्याही बलाढय़ संघाला जमलेले नाही, ते अफगाणिस्तान संघाने करून दाखवले. भारतासारखा बलाढय़ संघ एका कमकुवत संघासमोर कसा गडगडला, असा विचार करणे चुकीचे आहे. कारण विश्वचषकात प्रत्येक संघ हा कोणत्या ना, कोणत्या उद्दिष्टाने खेळत असतो. त्यामुळे ते आपल्या कौशल्याचा प्रभाव कुठे तरी दाखवतातच आणि तेच नेमके भारताच्या नशिबात आले.

भारताने नाणेफेक जिंकून घेतलेला फलंदाजीचा निर्णय चुकीचा नव्हता. पण त्या धिम्या गतीच्या खेळपट्टीवर किती धावांची गरज आहे, याचा भारताने अंदाज लावण्याची गरज होती. या खेळपट्टीवर २७०-२७५ धावांचे लक्ष्य ठेवले असते, तर भारताला हा सामना आरामात जिंकता आला असता. कोणताही संघ जेव्हा मैदानात उतरतो आणि खेळपट्टीची पाहणी करून मैदानाचा आराखडा काढतो, तेव्हा त्यांना या सामन्यामध्ये आपल्याला जिंकण्यासाठी किती धावांची गरज आहे, हे समीकरण आखतो. भारताने याचा अभ्यास जरी केला असला तरी त्या रणनीतीने भारतीय संघ खेळताना दिसला नाही.

विराट कोहलीने सांगितल्याप्रमाणे या खेळपट्टीवर आडव्या बॅटने मारलेले फटके लागणार नव्हते. त्यामुळे खेळाडूंना सरळ खेळावे लागणार होते. हे अगदी बरोबर असताना लोकेश राहुलला नाहक फटका खेळण्याची आवश्यकता नव्हती. विराटने सरळ बॅटने फलंदाजी करून  जास्तीत-जास्त धावा काढण्यावर भर दिला. त्याने गरज नसताना कोठेही चौकार-षटकार मारण्याचा प्रयत्न न करता आपली अनुभवी खेळी साकारली. काही साधारण चुका झाल्यामुळे भारताला २२४ धावांवर समाधान मानावे लागले.

भारताच्या गोलंदाजीबद्दल सांगायचे झाले, तर विजय शंकरला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेतले होते. परंतु खेळपट्टीच्या अनुषंगाने कर्णधार विराटने त्याला गोलंदाजीसाठी वापरले नाही, ते मला योग्य वाटले. शमीने खेळाची सुरुवात चांगली केली. सामन्याला कलाटणी देण्यामध्ये शमीचा सिंहाचा वाटा आहे. तीन चेंडूमध्ये तीन गडी बाद करत शमीने अफगाणिस्तानचा डाव संपुष्टात आणला.

विराटच्या नेतृत्वाचे कौतुक करायला हवे. अफगाणिस्तानची जमलेली जोडी फोडण्याची गरज होती, तेव्हा त्याने जसप्रीत बुमरासारख्या जागतिक दर्जाच्या गोलंदाजाला २८वे षटक टाकण्यास सांगितले. त्याच षटकात बुमराने रहमत शहा आणि हशमतुल्ला शाहिदीसारख्या फलंदाजांना बाद केले आणि भारताच्या विजयाच्या आशा उंचावल्या. मात्र या खेळपट्टीवर रवींद्र जडेजाचा विचार करायला हवा होता. कारण त्याच्याकडून चेंडू जोरात येतो. दुसऱ्या फिरकी गोलंदाजांचे चेंडू पाहिजे तसे बॅटवर येत असल्यामुळे फलंदाजांसाठी फटके खेळणे सोपे जात होते. अफगाणिस्तानऐवजी दुसरा बलाढय़ संघ भारतासमोर असता तर त्याने भारताला जिंकू दिले नसते. अनुभवाच्या कमतरतेमुळे अफगाणिस्तानला हा सामना जिंकता आला नाही. भारतीय फलंदाजांनी आपल्या चुका सुधारून पुढच्या सामन्यात अधिक क्षमतेने उतरण्याची आवश्यकता आहे.