विश्वचषकातील उपांत्य सामन्यात भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा धक्का बसला आहे. या सामन्यात आघाडीची फळी अपयशी ठरल्याचा फटका भारतीय संघाला बसला आहे. आघाडीचे तीन फलंदाज प्रत्येकी फक्त एका धावेवर बाद झाले. रनमशीन आणि चेसमास्टर म्हणून ओळखला जाणारा भारतीय कर्णधार विराट कोहली महत्वाच्या सामन्यात फक्त एका धावेवर बाद झाल्यामुळे चाहत्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आतापर्यंत पाच नॉकआऊट सामन्यात विराट कोहली खेळला आहे. पाचही सामन्यात विराट कोहली अपयशी ठरल्याचे आकड्यावरून दिसून येत आहे. या नॉकआऊट सामन्यात २०१५ आणि २०११ मधील विश्वचषकाच्या महत्वाच्या सामन्याचा समावेश आहे.

महत्वाच्या सामन्यात विराट कोहली आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी आल्याचे आकडेवारीवरून पाहायला मिळाले आहे. पाच नॉकआऊट सामन्यात विराट कोहलीने १४.४० च्या सरासरीने फक्त ७२ धावा केल्या आहेत. यादरम्यान फक्त एकवेळा त्याला ३० पेक्षा आधिक धावा काढता आल्या आहेत. तीन विश्वचषकातील उपांत्य सामन्याची आकडेवारी पाहिल्यास विराट कोहलीने ३.६७ च्या सरासरीने फक्त ११ धावा केल्या आहेत. २०११ मध्ये पाकिस्तानविरोधात ९ धावा, २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि २०१९ मध्ये न्यूझीलंडविरोधात फक्त एक धाव करता आली आहे.

२०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही विराट कोहली आपल्या लौकिकास साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला होती. पाकिस्तानच्या मोहम्मद आमिरने विराट कोहलीला स्वस्तात माघारी पाठवले होते.  विराट कोहलीने २२८ डावांत ४१ शतकांसह ५९.६० च्या सरासरीने ११२८६ धावा केल्या आहेत. विराट कोहलीच्या करियरमधील सरासरी आणि मोक्याच्या सामन्यातील सरासरीमध्ये खूपच तफावत दिसून येतेय. या आकडेवारीवरून मोठ्या सामन्यात रनमशीन विराट कोहली अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, सचिन तेंडुलकरने म्हटल्याप्रमाणे प्रत्येकवेळा आपण धोनी, विराट आणि रोहित शर्माच्या कामगिरीवर अवलंबून राहू शकत नाही. इतर खेळाडूंनीही आपली जबाबदारी ओळखून खेळायला हवं.

दरम्यान, उपांत्य सामन्यात भारताचे आघाडीचे फलंदाज स्वस्तात माघारी गेल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना फक्त प्रत्येकी एक धाव काढता आली. न्यूझीलंडने दिलेले २४० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ २२१ धावांत गारद झाला. अष्टपैलू रविंद्र जाडेजा आणि धोनी यांनी शतकी भागिदारी करत विजयाच्या आशा वाढवल्या होत्या. मात्र, दोघेही ठरावीक अंतराने बाद झाल्यामुळे भारतीय संघाला पराभवाचा धक्का बसला.