ICC World Cup 2019 : विश्वचषक स्पर्धेला ३० मे पासून सुरुवात झाली. पण भारतीय संघाचा पहिला सामना ५ जून म्हणजेच उद्या होणार आहे. भारताचे माजी खेळाडू आणि क्रिकेट जाणकार यांनी भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असल्याचे अनेकदा म्हटले आहे. जगभरातील क्रिकेट चाहत्यांनीदेखील भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. यात जगजेत्या फुटबॉल संघाच्या खेळाडूचीही भर पडली आहे.

टीम इंडियावर पहिल्या सामन्यापूर्वीच शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला आहे. फुटबॉल विश्वविजेत्या जर्मनीच्या संघातील दिग्गज खेळाडू थॉमस म्युलर याने कोहलीला पहिल्या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. २०१० च्या ब्राझील फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीने कांस्यपदक मिळवले. पण त्यानंतर २०१४ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा संघ विश्वविजेता ठरला. या विश्वविजेत्या संघात थॉमस म्युलरचा समावेश होता.

”क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व संघांना माझ्याकडून शुभेच्छा. या स्पर्धेत सामने रोमांचक होतीलच. पण मला प्रामुख्याने भारतीय संघाचा विजय अपेक्षित आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याला माझ्याकडून विशेष शुभेच्छा. तो देखील जर्मनीच्या संघाचा चाहता आहे आणि त्याने यापूर्वी अनेकदा जर्मन फुटबॉल संघाला पाठींबा दिला आहे.”, अशा शब्दात म्युलरने त्याला शुभेच्छा दिल्या.

विशेष म्हणजे या ट्विटला कोहलीनेही झकासपैकी उत्तर दिले आणि त्याचे आभार मानले.

याशिवाय भारतीय फुटबॉल संघानेही व्हिडिओच्या माध्यमातून टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या.

त्यावरही विराटने त्यांचे आभार मानले आहेत.

दरम्यान, भारतीय संघाची १५ एप्रिलला घोषणा करण्यात आली. BCCI च्या मुंबई येथील मुख्यालयात कर्णधार विराट कोहली आणि निवड समिती सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर संघाची घोषणा करण्यात आली. १५ खेळाडूंच्या चमूत कर्णधार विराट कोहली, उपकर्णधार रोहित शर्मा, शिखर धवन, जसप्रीत बुमराह, महेंद्रसिंग सिंग धोनी, मोहम्मद शमी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल या खेळाडूंची संघातील जागा पक्की मानली जात होतीच. पण बैठकीत संघातील इतर चार ते पाच जागांसाठी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. त्यानंतर लोकेश राहुल, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक आणि रवींद्र जाडेजा यांना संधी देण्याचे निश्चित करण्यात आले.

२०१९ विश्वचषकाचं भारतीय संघाचं संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे –

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ५ जून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया – ९ जून
भारत विरुद्ध न्यूझीलंड – १३ जून
भारत विरुद्ध पाकिस्तान – १६ जून
भारत विरुद्ध अफगाणिस्तान – २२ जून
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज – २७ जून
भारत विरुद्ध इंग्लंड – ३० जून
भारत विरुद्ध बांगलादेश – २ जुलै
भारत विरुद्ध श्रीलंका – ६ जुलै