विश्वचषक स्पर्धेतील बांगलादेश विरुद्धच्या महत्वाच्या सामन्यात भारताने आज संघामध्ये दोन बदल केले आहेत. कुलदीप यादव आणि केदार जाधवला संघातून वगळले असून त्यांच्याजागी भुवनेश्वर कुमार आणि दिनेश कार्तिकला संधी दिली आहे.

इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव महागडा गोलंदाज ठरला होता. त्याने १० षटकात ७२ धावा दिल्या होत्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारला दुखापत झाली होती. त्यानंतर तो तंदुरुस्तही झाला. पण मोहम्मद शमीच्या चांगल्या गोलंदाजीमुळ भुवनेश्वरला इंग्लंड विरुद्ध संधी मिळाली नाही.

इंग्लंड विरुद्ध रविवारी सामना झाला त्याच एजबॅस्टनच्या मैदानावर सामना होत आहे. केदार जाधवला अनेकदा संधी मिळूनही तो अपेक्षित छाप पाडू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्या जागी दिनेश कार्तिकला खेळवण्याची मागणी होत होती अखेर दिनेश कार्तिकसाठी संघाचे दरवाजे उघडले आहेत. गुण तक्यात ११ गुणांसह भारत दुसऱ्या स्थानावर आहे. उपांत्यफेरीत प्रवेश करण्यासाठी भारताला आज विजय आवश्यक आहे तसेच बांगलादेशलाही आव्हान टिकवून ठेवण्यासाठी जिंकावेच लागेल.