२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने आक्रमक सुरुवात केली आहे. सलामीचे दोन सामने जिंकल्यानंतर भारतासमोर आता न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. मात्र जगभरातील क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलेलं आहे ते रविवारी रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याकडे. या सामन्यासाठी दोन्ही देशांमधल्या प्रसारमाध्यमांनी वातावरणामध्ये रंग भरायला सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरही दोन्ही देशांचे चाहते एकमेकांना ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या सगळ्या प्रकारावर टेनिसपटू सानिया मिर्झा चांगलीच वैतागली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर तिने दोन्ही देशांमध्ये सुरु असलेल्या जाहीरात युद्धावर नाराजी व्यक्त केली आहे.

“दोन्ही देशांमध्ये अशा द्वेष निर्माण करणाऱ्या जाहिराती तयार करण्यात आल्या आहेत. अशा प्रकारच्या जाहिरातींची खरचं आवश्यकता नाही. मुर्खपणाचा बाजार मांडला आहे. हा केवळ क्रिकेट सामना आहे आणि त्याची दोन्ही देशांतील चाहत्यांमध्ये चांगली उत्सुकता आहे”, अशा शब्दात सानियाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान १६ जून रोजी रंगणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट असणार आहे. त्यामुळे या लढतीत नेमका काय निकाल लागतो हे पाहणं महत्वाचं ठरेल.