जागतिक क्रिकेटचे नियंत्रण करणारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद ही शिखर संघटनाही संलग्न सदस्यांना समान निधी वाटप करत नाही असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. निधी वितरण, ताळेबंदातील त्रुटी आणि कारभारात पारदर्शकतेचा अभाव या मुद्यांवरून सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयवर ताशेरे ओढले होते. त्या पाश्र्वभूमीवर ठाकूर बोलत होते. प्रदर्शनाच्या बळावर कसोटी खेळणाऱ्या सदस्यांना आयसीसीतर्फे देण्यात येणाऱ्या निधी वाटपात प्राधान्य मिळते असा खुलासाही त्यांनी केला.
‘क्रीडा संघटनांच्या कामकाजाचे लोकशाहीकरण खेळाच्या हिताचे नाही. फिफाने याची अंमलबजावणी केली आणि त्याचा त्यांना फटका बसला. आयसीसी सदस्यांची पूर्णवेळ, संलग्न अशी वर्गवारी आहे. जागतिक संघटनांमध्ये याच धर्तीवर संरचना असते. आम्ही चुकीचा पायंडा पाडलेला नाही. पूर्ण सदस्यत्त्व मिळवण्यासाठी राज्य संघटना प्रयत्न करतात. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळताच बढती मिळते आणि मिळणाऱ्या निधीतही साहजिक वाढ होते’, असे ठाकूर यांनी सांगितले.
खेळाच्या वाढीसाठी बीसीसीआयने योग्य पाऊले उचलली असल्याचा दावाही ठाकूर यांनी केला. ‘बीसीसीआयच्या भूमिकेला चाहत्यांनी वेळोवळी पाठिंबा दिला आहे. अन्य देशांना आम्ही मदत करत आहोत. केवळ बीसीसीआयसाठी पैसा जमवलेला नाही तर खेळाडूंच्या भल्यासाठी त्याचा विनियोग करण्यात येतो आणि त्यामुळेच जागतिक स्तरावर भारताचे वर्चस्व आहे’, असे ठाकूर यांनी सांगितले.