भारताच्या इंग्लंड दौऱ्यावर गाजत असलेल्या जेम्स अँडरसन आणि रवींद्र जडेजा यांच्यातील वादविवादाच्या प्रकरणाला शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) सहा तासांच्या सुनावणीमध्ये अँडरसन आणि जडेजा हे दोघेही निर्दोष असल्याचा निकाल देण्यात आला असून क्रिकेटजगतामध्ये यावर ‘दोनो बच गए’ अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
न्यायआयुक्त गॉर्डन लुइस यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे केलेल्या सुनावणीचा निकाल आल्यावर अँडरसनला दिलासा मिळाला. कारण या प्रकरणात तो दोषी आढळला असता तर त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी येऊ शकली असती.
पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहाराला जाताना अँडरसनने जडेजाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप भारतीय संघ व्यवस्थापनाने केला होता. त्याविरोधात इंग्लंडच्या क्रिकेट मंडळाने जडेजाने अँडरसनविरोधातही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी केलेल्या सुनावणीमध्ये जडेजाला दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर बीसीसीआयने याबाबत आयसीसीकडे दाद मागितली होती. शुक्रवारी आयसीसीच्या निकालात जडेजाही निर्दोष सुटल्याने त्याच्याकडून दंड आकारण्यात येणार नाही.
आयसीसीने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘न्यायआयुक्त गॉर्डन लुइस यांनी आयसीसीच्या नियमावलीनुसार अँडरसन आणि जडेजा दोघेही निर्दोष ठरवले आहे. लुइस यांनी ‘व्हिडीओ कॉन्फरन्स’द्वारे सहा तास सुनावणी केली. यामध्ये त्यांनी भारत आणि इंग्लंडच्या संघाने सादर केलेले पुरावे कायदेतज्ज्ञांकडून पडताळून पाहण्यात आले.’’