भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचे मत

नवी दिल्ली : करोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर घालण्यात आलेल्या बंदीबरोबरच अन्य मार्गदर्शक तत्त्वे ही फक्त हंगामी उपाययोजना आहे. करोनाचा प्रादूर्भाव आटोक्यात आल्यानंतर पुन्हा जुन्या नियमांप्रमाणेच क्रिकेटचे सामने खेळले जातील, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू आणि ‘आयसीसी’च्या क्रिकेट समितीचा अध्यक्ष अनिल कुंबळेने व्यक्त केले.

कुंबळेच्या अध्यक्षतेखालील या समितीने शुक्रवारी ‘आयसीसी’कडे चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा उपयोग करणे धोकादायक आहे, असे निवेदन सादर केले होते. त्यानंतरच ‘आयसीसी’ने लाळेचा वापर करण्यास मनाई करण्याबरोबरच पंच आणि खेळाडूंसाठीही नवी नियमावली आखली. परंतु खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींनी या तत्त्वांविषयी अधिक चिंता करण्याची गरज नाही, असे कुंबळेला वाटते.

‘‘खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ‘आयसीसी’तर्फे लागू करण्यात आलेली मार्गदर्शक तत्त्वे ही तात्पुरत्या स्वरूपाची आहेत. ज्यावेळी करोनावर पूर्ण नियंत्रण मिळवण्यात आपण यशस्वी होऊ, त्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या सामन्यांना पारंपरिक नियमांनुसार सुरुवात होईल,’’ असे ४९ वर्षीय कुंबळे म्हणाला.

‘आयसीसी’च्या नव्या नियमांनुसार खेळाडूंना चेंडूला लकाकी देण्यासाठी लाळेचा वापर करण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे खबरदारी म्हणून खेळाडूंनी पंचांना टोपी, गॉगल अथवा स्वेटर देण्यासही आता परवानगी नसून पंचांना हातमोजे घालणे अनिवार्य आहे. परंतु चेंडूला लकाकी देण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर करण्याबाबत ‘आयसीसी’ने अद्याप काहीही अधिकृतपणे जाहीर केलेले नाही.

‘‘एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० सामन्यांत गोलंदाजांना चेंडूला लकाकी देण्यासंबंधीची समस्या फारशी जाणवणार नाही. परंतु कसोटी सामन्यांत चेंडूला लकाकी देणे खरेच गरजेचे असते. मात्र कृत्रिम पदार्थाचा वापर न करता गोलंदाजांसाठी कोणती उपाययोजना आखता येऊ शकेल, याविषयी ‘आयसीसी’ विचार करत आहे. कारण कृत्रिम पदार्थाचा वापर केल्यास चेंडूशी फेरफार करण्याचा नियम क्रिकेटमधून पूर्णपणे हद्दपार करावा लागेल,’’ असेही भारताचा माजी कर्णधार कुंबळेने सांगितले. २०१८मध्ये ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्राफ्ट यांनी चेंडूला लकाकी देण्यासाठी कृत्रिम पदार्थाचा वापर केल्याने तिघानांही निलंबनाची शिक्षा भोगावी लागली होती.

‘आयसीसी’च्या नियमांमध्ये स्पष्टतेचा अभाव -शाकिब

ढाका : ‘आयसीसी’तर्फे जाहीर करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टतेचा अभाव असल्याची प्रतिक्रिया बांगलादेशचा निलंबित क्रिकेटपटू शाकिब अल हसनने व्यक्त केली. ‘‘निश्चितच ‘आयसीसी’ने जाहीर केलेल्या नव्या तत्त्वांविषयी मला अनेक प्रश्न पडले आहेत. करोनाचा फैलाव १२ फुटापर्यंत होऊ शकतो, हे आपल्याला ठाऊक आहे. परंतु दीड मीटरचे अंतर ठेवून खेळल्यास दोन फलंदाज षटक संपल्यानंतर एकमेकांशी संवाद कसे साधणार. त्याचप्रमाणे फिरकीपटू गोलंदाजी करताना यष्टिरक्षक यष्टय़ांना लागून म्हणजेच फलंदाजाच्या फार जवळ उभा असतो, अशा वेळी मग ‘आयसीसी’ काय करणार,’’ यांसारखे अनेक प्रश्न शाकिबने ‘आयसीसी’ला विचारले आहेत.