भारत विरुद्ध विंडीज मालिकेमधील अंतीम सामना अगदीच एकतर्फी झाला. मात्र या सामन्याआधी भारताचा माजी फलंजदाज राहुल द्रविडचा विशेष सत्कार करुन त्याला ICC च्या Hall of Fame मध्ये समाविष्ट करण्यात आले. या सत्कार समारंभाची चर्चा दिवसभर सोशल नेटवर्किंगवर सुरु होती. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते राहुल द्रविडला हा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे व्हिडीओ तसेच फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले. आपल्या लाडक्या द्रविडला शुभेच्छा देण्यासाठी नेटकऱ्यांनी सोशल नेटवर्किंगचा आधार घेतला. म्हणूनच ICC च्या Hall of Fame आणि Rahul Dravid हे दोन विषय ट्विटरच्या टॉप ट्रेण्डिंगमध्ये दिसत होते.

बरं अनेक वर्षे देशासाठी क्रिकेट खेळणाऱ्या आणि खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही प्रशिक्षकाच्या भुमिकेतून भारतीय क्रिकेटचे भविष्य असणाऱ्या तरुणांचा मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या द्रविडचे अनेकांनी तोंड भरून कौतूक केले. ऑन लाइनबरोबरच त्रिवेंद्रमच्या मैदानात उपस्थित असलेल्या हजारो चाहत्यांनी द्रविडचा सन्मान झाल्यानंतर आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे समाना सुरु झाल्यानंतर सामन्याचा आनंद घेणाऱ्या द्रविडला ज्यावेळी मैदानात लावण्यात आलेल्या मोठ्या स्क्रीनवर दाखवण्यात आले त्यावेळी प्रेक्षकांनी मैदानात एकच कल्ला करत द्रविडची लोकप्रियता आजही कायम असल्याचे दाखवून दिले. यावेळी समालोचकांनी द्रविडला असं मोठ्या स्क्रीनवर दाखवल्याने तो थोडा अवघडल्यासारखा झाल्याचे निरिक्षण नोंदवले. द्रविडला या सगळ्याची (असं मोठ्या स्क्रीनवर दाखवल्या जाण्याची किंवा उगच प्रसिद्धी मिळवण्याची) सवय नाही म्हणून त्याला अवघडल्यासारखे होत असावे असेही समालोचक म्हणाले. पण जेव्हा तुम्ही देशासाठी खेळताना अनेक विक्रम रचता तेव्हा चाहत्यांकडून इतके प्रेम मिळणे सहाजिक असल्याचेही समालोचक म्हणाले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ ट्विटवर चांगलाच हीट ठरला आहे. तुम्हीच पाहा द्रविडचा साधेपणा दाखवणारा हा व्हिडीओ

भारताने मालिकेतील हा निर्णायक सामना ९ गडी राखून जिंकला. त्याच बरोबर भारताने मालिका ३-१ च्या फरकाने जिंकली.