आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीने एक एप्रिलपासून क्रिकेटमध्ये काही बदलांची घोषणा केली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर या बदलांची माहिती आयसीसीने दिली आहे. यामध्ये खेळाडूंच्या जर्सीवर इन्स्टाग्राम हँडलपासून, नाणेफेकीऐवजी ट्विटर पोल घेण्यात येणार असल्याचंही आयसीसीने म्हटलं आहे. क्रिकेटच्या खेळाकडे चाहत्यांचा कल अधिक वाढावा आणि आगामी पिढीतील खेळाडूंना या खेळाचं आकर्षण वाढावं यासाठी, नियमांमध्ये बदल करण्यात येत असल्याचं आयसीसीने स्पष्ट केलंय. विश्वचषकानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या Ashes कसोटी मालिकेपासून हे बदल लागू होणार असल्याचं आयसीसीने म्हटलंय. मात्र अनेक चाहत्यांनी ICC एप्रिल फूल करत असल्याची शंका व्यक्त केली आहे.

“होय, १ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी हे नियम लागू होणार आहेत. कसोटी क्रिकेटचा जगभर अधिकाधीक प्रसार करण्यासाठी आखण्यात आलेल्या नवीन नियमांचा हा एक भाग आहे.” आयसीसीच्या Strategic Communications विभागाच्या जनरल मॅनेजर क्लेरी फरलाँग यांनी पीटीआयशी बोलताना ही माहिती दिली आहे.

इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर जर्सीवर खेळाडूंच्या इन्स्टाग्राम हँडल छापण्याच्या नियमाचं स्वागत केलं आहे. कसोटी क्रिकेटमध्ये हा बदल याआधीच करण्यात यायला हवा होता असंही वॉन म्हणाला. फक्त हा प्रकार एप्रिल फूल आहे असं सांगून माझा हिरमोड करु नका, अशी भीतीही वॉनने व्यक्त केली आहे.

तर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने, आयसीसीच्या ट्विटर हँडलवर, आता खेळाडूंचे व्हॉट्स अप क्रमांक आणि ट्विटर हँडल टाकणार का असा उपरोधिक प्रश्न विचारला आहे.

जर्सीवर इन्स्टाग्राम हँडल आणि नाणेफेकीऐवजी ट्विटर पोल याखेरीज आयसीसीने आणखी काही बदलांची घोषणाही केली आहे. यामध्ये बेसबॉलप्रमाणे ‘डबल विकेट प्ले’, नो-बॉल आणि डॉट बॉल यापुढे फॉल्ट्स आणि एसेस या नावाने ओळखले जाणार, अशा अनेक नियमांचा समावेश आहे. याचसोबत समालोचकांना स्टेडीयममध्ये बसवण्याऐवजी मैदानात खेळाडूंमागे उभं राहण्याच्या नियमाचाही समावेश आहे. याआधी विंडीज विरुद्ध विश्व एकादश सामन्यात इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने मैदानात मायक्रोफोन घालून समालोचन केलं होतं.

आयसीसीच्या या नवीन नियमांमुळे चाहत्यांमध्ये चांगलंच संभ्रमाचं वातावरण आहे. सर्वसाधारणपणे एक एप्रिल म्हणून हा प्रकार करण्यात आल्याचा अनेकांचा अंदाज आहे. आयसीसीने अजुनही याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. त्यामुळे येत्या दिवसभरात नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.