२०२० हे वर्ष क्रिकेटसाठी फारसं चांगलं नव्हतं. सुमारे पाच ते सहा महिने करोनामुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प होतं. पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकादेखील स्थगित करण्यात आल्या होत्या. वर्षाच्या अखेरीस हळूहळू क्रिकेटने पुन्हा जोर धरला. आता करोनासंदर्भातील नव्या नियमांनुसार क्रिकेट मालिका खेळल्या जात आहेत. तशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच ICCने देखील क्रिकेटपटूंसाठी एक नवा पुरस्कार सुरू केला आहे.

राशिद खानच्या ‘बाहुबली’ लूकवर वॉर्नरची मजेशीर कमेंट

जानेवारी २०२१पासून ICCतर्फे दर महिन्याला एक नवीन पुरस्कार देण्यात येणार आहे. महिन्यातील सर्वोत्तम पुरूष व स्त्री क्रिकेटपटूचा सन्मान या पुरस्काराअंतर्गत करण्यात येणार आहे. Player of the Month असा पुरस्कार असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या पुरस्कारासाठी चाहत्यांनाही नामांकन मिळणाऱ्या खेळाडूंना मत देता येणार आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या विविध क्रिकेट मालिकांमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड या संघातील काही खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. वॉशिंग्टन सुंदर, टी नटराजन, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, जो रूट यांसारखे खेळाडू या पुरस्कारासाठी शर्यतीत आहेत. आता पुरस्कारासाठी नामांकन कोणाला मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

‘असा’ निवडला जाईल विजेता…

ICCकडून दर महिन्याला पुरूष आणि स्त्री अशा दोन्ही प्रकारात महिन्यातील ३ सर्वोत्तम क्रिकेटपटूंची नामांकनं दिली जातील. खेळाडूचा मैदानावरील पराक्रम, वावर आणि महिन्यात केलेले विक्रम या साऱ्याचा विचार करून हे तीन खेळाडू नामांकित केली जातील. एकूण मतदानाच्या टक्केवारीपैकी ICCच्या मतदान अकादमीकडे ९० टक्के तर चाहत्यांकडे १० टक्के मतदानाचे अधिकारी असतील. ICCच्या अधिकृत संकेतस्थळावर चाहत्यांना आपलं मत नोंदवता येणार आहे. विजेत्या खेळाडूंची नावं दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी जाहीर केली जातील.