क्रिकेटमधील सध्या सुरू असलेली भ्रष्टाचाराची चौकशी ही खेळासाठी चिंताजनक असून, चाहत्यांना खेळाचा निखळ आनंद लुटायचा आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
गेल्या वर्षी दोनशेव्या कसोटी सामन्यानंतर सचिनने क्रिकेटला अलविदा केला. परंतु निवृत्तीनंतरही तो क्रिकेटविषयी काळजीपूर्वक विचार करतो.
‘‘भ्रष्टाचार हा खेळासाठी चिंताजनक असून, संबंधित व्यक्तींनी त्वरित महत्त्वाची पावले उचलण्याची आवश्यकता आहे. क्रिकेटरसिकांना खेळाचा योग्य आनंद लुटता यायला हवा,’’ असे सचिनने सांगितले. आयसीसीच्या सध्या सुरू असलेल्या चौकशीमधील काही गोष्टी प्रसारमाध्यमांतून लोकांसमोर आल्या होत्या. येत्या ५ जुलैला मेरिलिबोन क्रिकेट क्लबच्या द्विशतकपूर्तीनिमित्त विश्व इलेव्हन विरुद्ध होणाऱ्या सामन्यात सचिन एमसीसीचे नेतृत्व करणार आहे. या संघात ब्रायन लाराचा समावेश आहे.‘‘मी आणि लारा या एकाच संघासाठी याआधीसुद्धा खेळलो आहोत आणि चांगली भागीदारीही केली आहे. त्यामुळे या सामन्यातही माझ्या अपेक्षा आहेत,’’ असे सचिनने सांगितले.