आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) टी-२० वर्ल्डकपमध्ये संघात वाढ करण्याच्या विचारात आहे. या स्पर्धेत १६ संघ सहभागी होतात, मात्र आता ही संख्या २० अशी होऊ शकते. क्रिकइन्फोच्या रिपोर्टनुसार, यंदा भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्डकपमधील संघामध्ये कोणताही बदलर होणार नाही. २०२४च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये २० संघ खेळवण्यात येऊ शकतात.

याव्यतिरिक्त, आयसीसी ५० षटकांच्या वर्ल्डकपमध्येही सहभागी होणाऱ्या संघांची संख्या वाढविण्याची शक्यता आहे. २०१९मध्ये झालेल्या वर्ल्डकपमध्ये ही संख्या १४वरून १० अशी करण्यात आली होती.

यंदाचा टी-२० वर्ल्डकप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणार आहे, पण भारतातील करोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे या स्पर्धेचे आयोजन करण्यासंदर्भात अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीला या वर्ल्डकप स्पर्धेसाठी पर्यायी स्थळ म्हणून ठेवण्यात आले आहे.

आयपीएल २०२१ स्थगित

भारतात करोनाची दुसरी लाट कायम आहे. दरम्यान, आयपीएल २०२१ बंद दरवाजांच्या मागे खेळवण्यात येत होते. २९ सामने खेळवले गेल्यानंतर करोनाने बायो बबलमध्ये एन्ट्री घेतली. कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू वरुण चक्रवर्ती आणि संदीप वॉरियर संक्रमित आढळले. चेन्नई सुपर किंग्जचा गोलंदाजी प्रशिक्षक बालाजी संक्रमित असल्याचे आढळले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी दिल्ली कॅपिटल्स संघाचे दोन खेळाडू अमित मिश्रा आणि सनरायझर्स हैदराबादच्या वृद्धिमान साहा यांना संसर्ग झाल्याचे आढळले.