आयसीसीची बुधवारी दुबईमध्ये बैठक

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी समितीच्या बैठकीत भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करून भारताची सुरक्षेबाबतची चिंता मिटवण्यावर भर देण्यात येणार आहे. पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्काराच्या संभाव्य इशाऱ्याबाबतही बुधवारच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४०पेक्षा अधिक जवान शहीद झाल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताकडून पाकिस्तानविरुद्धच्या १६ जूनच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचा इशारा मिळण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आयसीसीला लिहिलेल्या पत्रात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर कायमस्वरूपी बहिष्कार टाकण्यात यावा, असे पत्रदेखील पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यात पाकिस्तानच्या नावाचा उल्लेख बीसीसीआयने केलेला नाही. बीसीसीआयने ३० मेपासून इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकातील भारतीय खेळाडू, पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे विश्वचषकासाठी केलेल्या सर्व प्रकारच्या सुरक्षाव्यवस्थेची माहिती आयसीसीकडून देण्यात येणार आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनी पाकिस्तानविरुद्धच्या साखळी सामन्यावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले आहे. त्यानंतरही पाकिस्तानचा संघ उपांत्य किंवा अंतिम फेरीत आमनेसामने आल्यास काय करायचे, त्याबाबत विधान केलेले नाही.

दुसरीकडे सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांनी विश्वचषकात पाकिस्तानशी सामना न खेळता त्यांना दोन गुण बहाल करणे भारतासाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पाकिस्तानशी खेळण्याबाबत भारत सरकार आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असल्याचे म्हटले आहे.