आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत गोलंदाजांमध्ये भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहची घसरण झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका भारताला २-१ ने गमवावी लागली. बुमराहला या मालिकेत आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली. याचाच फटका त्याला क्रमवारीत बसलेला आहे. दुसऱ्या स्थानावरुन बुमराह तिसऱ्या स्थानावर आला आहे, तर अफगाणिस्तानच्या मुजीब उर-रेहमानने दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. बुमराहच्या खात्यात ७०० गुण जमा आहेत.

इतर गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून चांगली कामगिरी करणाऱ्या जोश हेजलवूडने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. दुसरीकडे फलंदाजीच्या क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचं अनुक्रमे पहिलं आणि दुसरं स्थान कायम आहे. वन-डे मालिका गाजवणारा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार फिंच क्रमवारीत पाचव्या स्थानावर आला आहे. भारताविरुद्ध केलेल्या धडाकेबाज कामगिरीचा त्याला फायदा झालेला दिसत आहे. याचसोबत डेव्हिड वॉर्नरही आठव्या स्थानावरुन सातव्या स्थानावर आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे आणि टी-२० मालिका संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ आता कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये १७ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे.