भारतीय वन-डे संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांनी आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम राखलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारताचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह दुसऱ्या स्थानी कायम राहिला आहे. गुरुवारी आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी जाहीर केली.

आयसीसीनं जाहिर केलेल्या यादीत विराट ८७१ गुणांसह पहिल्या तर रोहित ८५५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा बाबर आजम ८२९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर रॉस टेलर ८१८ अन् डुप्लिसिस ७९० गुणांसह चौथ्या अन् पाचव्या स्थानावर आहेत. केन विल्यमसन ७६५ गुणांसह सहाव्या स्थानावर पोहचला आहे. त्याला दोन गुणांचा फायदा झाला आहे. अॅरोन फिंच सातव्या, डेविड वॉर्नर आठव्या आणि डिकॉक दहाव्या स्थानावर आहेत. इंग्लंडच्या जॉनी बेयरस्टोला ऑस्ट्रेलियाबरोबरच्या नुकत्याच झालेल्या मालिकेतील कामगिरीचा फायदा झाला आहे. जॉनी बेयरस्टोने क्रमवारीत अव्वल दहामध्ये स्थान मिळवलं आहे.

गोलंदाजांच्या यादीत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह ७१९ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडचा अनुभवी गोलंदाज ट्रेंट बोल्ट ७२२ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. ख्रिस वोक्सला तीन स्थानाचा फायदा झाला आहे. वोक्स सातव्या स्थानाहून तिसऱ्या स्थानावर पोहचला आहे.