X
X

ICC ODI Rankings : विराट, रोहितचं साम्राज्य अबाधित; जाडेजाचा दुहेरी धमाका

ICC ODI Rankings : पाहा कोणी घेतली किती स्थानांची झेप

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनी दमदार कामगिरी केली. त्या कामगिरीच्या जोरावर ICC च्या ताज्या एकदिवसीय क्रमवारीत या दोघांनी आपले स्थान कायम राखले आहे. ICC ODI rankings ची यादी सोमवारी जाहीर करण्यात आली. त्यात गोलंदाजांच्या यादीत जसप्रीत बुमराह देखील अव्वलस्थानी कायम आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहली याने दुसऱ्या आणि तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार अर्धशतक झळकावले. तीन सामन्यांच्या मालिकेत १८३ धावा करून विराटने मालिकावीराचा किताब पटकावला. त्याच्या या कामगिरीमुळे कोहली ८८६ गुणांसह अव्वल स्थानी कायम आहे. रोहित शर्मानेदेखील चांगली केली. त्याने एक अर्धशतक आणि १ शतक याच्या बळावर मालिकेत १७१ धावा केल्या. त्यामुळे रोहित ८६८ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे. पाकिस्तानचा बाबर आझम या यादीत ८२९ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे, असे ICC ने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

भारताकडून संघात पुनरागमन करणाऱ्या शिखर धवनने सात स्थानांची झेप घेत १५ वे स्थान पटकावले. त्याने केवळ २ सामन्यात १७० धावा केल्या. लोकेश राहुलने देखील मालिकेत १४६ धावा केल्या. त्यामुळे त्याने २१ स्थानांची झेप घेतली आणि तो ५० व्या स्थानी विराजमान झाला.

ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या मालिकेत पुनरागमन करणारा जसप्रीत बुमराह याने ७६४ गुणांसह आपले क्रमवारीतील अव्वलस्थान कायम राखले आहे. तो न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्ट आणि अफगाणिस्तानचा मुजीब उर रहमान यांच्याहून पुढे आहे. टॉप ५ मध्ये आफ्रिकेचा कागिसो रबाडा आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांचा समावेश आहे.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याने मालिकेत ४ बळी टिपत २ स्थानांची बढती घेतली. तो २७ व्या स्थानी विराजमान आहे. त्याचसोबत त्याने मालिकेत दोन डावात ४५ धावा केल्या. त्यामुळे अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत चार स्थानांची झेप घेत तो १० व्या स्थानी पोहोचला आहे.

24
First Published on: January 20, 2020 4:50 pm
  • Tags: bcci, icc,
  • Just Now!
    X