आशिया चषकातील कामगिरीचे रोहित शर्माला बक्षीस मिळाले आहे. आज जाहिर झालेल्या आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत रोहित शर्माने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.  दुखापतीमुळे आशिया चषकातून माघार घेणारा भारतीय कर्णधार विराट कोहली अव्वल स्थानावर कायम आहे. ८४४ गुणांसह रोहित शर्मा आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. रोहित शर्माची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे.

रोहित शर्माच्या पुढे भारतीय कर्णधार विराट कोहली आहे. विराट कोहलीच्या नावावर ९११ गुण आहेत. आयसीसी क्रमवारीत पहिल्या दहामध्ये भारताचा आणखी एक खेळाडू आहे. ८०२ गुणांसह शिखर धवन पाचव्या स्थानावर आहे. आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारताचे तीन, इंग्लंड-न्यूझीलंडचे प्रत्येकी दोन, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान-दक्षिण आफ्रिका यांचे प्रत्येकी एक खेळाडू आहेत. एकदिवसीय क्रमवारीत इंग्लंडचा संघ अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर दुसऱ्या स्थानावर भारतीय संघ आहे. कसोटी क्रमवारीत विराट कोहली आणि भारतीय संघ अव्वल स्थानावर कायम आहे.

गोलंदाजीचा विचार केल्यास एकदिवसीय क्रमवारीत कुलदीप यादवने मोठी झेप घेतली आहे. ७०० गुणांसह कुलदिप यादव गोलंदाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अव्वल स्थानावर कायम आहे. बुमराहच्या खात्यात ७९७ गुण आहेत. दुसऱ्या स्थानावर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशीद खान आहे. गोलंदाजीमध्ये पहिल्या दहांमध्ये फक्त दोन भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूमध्ये पहिल्या दहामध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही. ३५३ गुणासह अफगाणिस्तानचा राशीद खान अव्वल स्थानावर आहे.