आयसीसीच्या वर्ल्ड कप सुपरलिग स्पर्धेच्या पहिल्याच मालिकेत यजमान इंग्लंडने बाजी मारली आहे. साऊदम्पटनच्या मैदानावर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात इंग्लंडने आयर्लंडचं आव्हान ४ गडी राखत परतवून लावत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विजयासाठी दिलेलं २१३ धावांचं आव्हान पार करताना इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टोने धडाकेबाज ८२ धावांची खेळी केली. याच खेळीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

इंग्लंडच्या माऱ्यासमोर पहिल्या वन-डे सामन्यात आयर्लंडचा डाव गडगडला होता. दुसऱ्या वन-डे सामन्यात नाणेफेक जिंकत आयर्लंडचा कर्णधार अँडी बालब्रिनने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र दुसऱ्या सामन्यातही आयर्लंडच्या आघाडीच्या फळीतल्या फलंदाजांनी निराशा केली. १०० धावा व्हायच्या आतच संघाचे ६ फलंदाज माघारी परतले होते. अखेरच्या फळीत कर्टिस कँफरने सिमी सिंग आणि अँडी मॅगब्रिन यांना हाताशी घेत छोटेखानी भागीदाऱ्या रचल्या. या जोरावर आयर्लंडने २१२ धावांचा टप्पा गाठला. कँफरने या सामन्यात ६८ धावांची उपयुक्त खेळी केली. इंग्लंडकडून फिरकीपटू आदिल रशीदने ३ तर डेव्हिड विली-साकीब महमुद या जोडीने प्रत्येकी २-२ आणि टोपले-विन्स जोडीने १-१ बळी घेतला.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर जेसन रॉयचा यंगने ० धावांवर त्रिफळा उडवला. मात्र दुसऱ्या बाजूने जॉनी बेअरस्टोने इतर फलंदाजांसोबत एक बाजू लावून धरत इंग्लंडला संकटात सापडू दिलं नाही. मधल्या फळीत सॅम बिलींग्ज आणि अखेरच्या फळीत डेव्हिड विलीनेही फटकेबाजी करत बेअरस्टोला चांगली साथ दिली. याच प्रयत्नांच्या जोरावर इंग्लंडने आयर्लंडचं आव्हान ३३ व्या षटकात पूर्ण करत सामना आणि मालिकेत बाजी मारली. आयर्लंडकडून जोश लिटीलने ३, कर्टिस कँफरने २ तर क्रेग यंगने १ बळी घेतला.