ऑस्ट्रेलियाचा २५ वर्षीय सलामीवीर फिल ह्युजेस याला शेफील्ड शिल्ड स्पर्धेत फलंदाजी दरम्यान डोक्याला चेंडु लागला आणि त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मैदानात सामना सुरु असतानाच त्याच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. पण २०१४ साली आजच्याच दिवशी त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली होती.

उसळता चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे फिल ह्युज गंभीर जखमी झाला तो दुर्दैवी क्षण

 

सिडनीतील स्टेडियमवर सुरू असलेल्या दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि न्यू साउथ वेल्स या दोन्ही संघातील सामन्यादरम्यान ही घटना घडली होती. दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून खेळणाऱ्या ह्युजेस याला न्यू साउथ वेल्सचा गोलंदाज अबॉट याने टाकलेला उसळता चेंडू थेट डोक्याला लागला. तेथून त्याला थेट सेंट व्हिन्सेंट रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. पण तो मृत्यूवर मात करू शकला नाही. याबाबत ICCने त्याला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच हा क्रिकेट जगतातील काळ्या दिवसांपैकी एक असल्याचेही ICC ने ट्विट केले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ मोठ्या मानसिक तणावात होता. ज्या गोलंदाजाच्या चेंडूवर दुखापतग्रस्त झाल्याने ह्यूज मरण पावला, तो गोलंदाज अबॉटदेखील प्रचंड तणावाखाली होता. मात्र या प्रसंगातून बाहेर पडण्यास ऑस्ट्रेलियाच्या संघाने आणि सर्व क्रिकेट जगताने त्याला सहकार्य केले.