क्रिकेटला Gentlemen`s Game म्हटले जाते. त्यामुळे क्रिकेटमध्ये खेळभावना सर्वात महत्वाची असते. पण खेळाडूने गैरवर्तन केले, तर त्याच्यावर ICCकडून कारवाई करण्यात येते. त्यानुसार इंग्लंडचा कर्णधार जो रुट याच्यावर ICCकडून कारवाई करण्यात आली आहे. त्याला १ नकारात्मक गुण देण्यात आला असून सामनाधिकाऱ्यांनी त्याला सक्त ताकीद दिली आहे.

सध्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना हा प्रकार घडला आहे. श्रीलंकेचे फलंदाज चांगल्या लयीत फलंदाजी करत होते. त्यावेळी मोईन अलीच्या ७६व्या षटकातील एका चेंडूवर जिलरुवान परेराला नाबाद ठरवण्यात आले. याबाबत जो रुटने उघड उघड नाराजी दर्शवली होती.

मैदानावरील पंच मरे इरॅस्मस यांनी परेराला नाबाद ठरवल्यावर रुटने मैदानात जोरजोरात पाय आपटायला सुरुवात केली. ही गोष्ट सामनाधिकाऱ्यांनी पाहिली. त्यांनी रुटला बोलावून घेतले आणि त्याला ताकीद देण्यात आली.

ICCच्या नियमानुसार रुटला एक डीमेरीट गुण देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याला यापुढे असे कृत्य करू नये, अशी तंबी रुटला देण्यात आली आहे.