इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनची टीका

मेलबर्न : इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) क्रमवारी पद्धतीवर तोफ डागली आहे. ही क्रमवारी टाकाऊ आहे, अशा शब्दांत त्याने टीका केली आहे.

‘आयसीसी’च्या कसोटी क्रमवारीत सध्या भारत अग्रस्थानावर आहे. त्यापाठोपाठ न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा क्रमांक लागतो. न्यूझीलंड आणि इंग्लंडच्या संघाने गेल्या दोन वर्षांत पुरेशा कसोटी मालिका जिंकल्या नसल्यामुळे त्यांचे अनुक्रमे दुसरे आणि चौथे स्थान पटणारे नाही, असे क्रिकेटकडून समालोचनाकडे वळलेल्या वॉनने सांगितले.

‘‘गेल्या दोन वर्षांत न्यूझीलंडने बऱ्याच मालिका जिंकून दुसऱ्या स्थानापर्यंत मजल मारली आहे का, याचे मला आश्चर्य वाटते. इंग्लंडचा संघही गेली तीन-चार वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये झगडतो आहे. परदेशात तर सातत्याने अपयशी ठरत आहे,’’ असे वॉनने सांगितले.

‘आयसीसी’ क्रमवारीही गोंधळात टाकणारी आहे, असे २००३ ते २००८ या कालावधीत इंग्लंडच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणाऱ्या ४५ वर्षीय वॉनने सांगितले. या संघांपेक्षा ऑस्ट्रेलियाची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी अधिक प्रशंसनीय आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत हे दोन संघ कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ आहेत, याकडे त्याने लक्ष वेधले.