करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थिीतीचा फटका क्रीडा जगताला बसला होता. गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलच्या तेराव्या हंगामासह सर्व स्थानिक स्पर्धा स्थगित केल्या आहेत. मात्र स्पर्धा बंद असल्यामुळे क्रिकेट बोर्डांचं होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून आयसीसीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. क्रिकेट सुरु करण्यासाठी आयसीसीने काही नियम आखून दिले आहेत.

या नियमावलीत संघासमोर प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करण्यापासून ते आंतरराष्ट्रीय दौऱ्याआधी १४ दिवस Isolation Camp आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जाणून घेऊयात काय आहेत आयसीसीने नवीन नियम…

सुरक्षा –

१) संपूर्ण क्रिकेट विश्वाची सुरक्षा हे आयसीसीचं सध्याच्या घडीला प्रथम कर्तव्य आहे.

२) स्थानिक भागात करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची खात्री असल्यानंतरच क्रिकेट सराव सुरु केला जाईल.

३) कोणत्याही सराव सत्र किंवा सामन्याआधी; खेळाची आणि सरावाची जागा, ड्रेसिंग रुम, क्रिकेटचं साहित्य आणि इतर गोष्टींमार्फत प्रादूर्भाव होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे.

सरकारी सल्ल्यानुसार काम –

१) स्थानिक सरकारी अधिकाऱ्यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतरच आपापल्या भागात क्रिकेट सराव किंवा सामने सुरु करता येतील. एखाद्या भागात सरावासाठी किंवा सामन्यासाठी सरकारी परवानगी नसेल तर ती मिळेपर्यंत कोणत्याही प्रकारे क्रिकेट खेळलं जाणार नाही.

२) स्थानिक किंवा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी प्रवास करताना सर्व संघांना सरकारने दिलेल्या सूचना व नियमांचं पालन करावं लागणार आहे.

सकारात्मक प्रभाव –

१) करोनासारख्या विषाणूचा सामना करताना खेळाडूंची वागणूक ही समाजासमोर आदर्श निर्माण होईल अशी असली पाहिजे.

२) आंतरराष्ट्रीय संघटना म्हणून आयसीसी क्रिकेट पुन्हा एकदा सुरक्षित पद्धतीने खेळवलं जाईल यासाठी सर्व काळजी घेईल.

३) एखाद्या व्यक्तीचं आयुष्य रुळावर आणण्याची ताकद क्रिकेटमध्ये आहे. त्यामुळे मानसिक आणि शारिरीक तंदुरुस्ती साधण्याचं काम क्रिकेटकडून अपेक्षित आहे.