दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्राविरोधातील क्रिकेट लढती स्थगित करण्यात याव्यात, ही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआय) मागणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) फेटाळली आहे. या प्रकरणांमध्ये भूमिका घेणे हे ‘आयसीसी’चे कार्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० सैनिक ठार झाले होते. या संदर्भात ‘बीसीसीआय’ने ‘आयसीसी’ला आणि तिच्या सदस्य राष्ट्रांना पत्र पाठवून दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्राविरोधातील क्रिकेट सामन्यांना स्थगिती देण्याची मागणी केली होती.

‘‘या संदर्भातील निर्णय सरकारी स्तरावर घेतला जाऊ शकतो; परंतु ‘आयसीसी’कडे याबाबत कोणतीही नियमावली नाही. ‘बीसीसीआय’ला याची पूर्णत: माहिती असूनही त्यांनी हा पत्रव्यवहार केला,’’ अशी माहिती संघटनेच्या सूत्रांनी दिली.

भारतातील दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा ‘बीसीसीआय’च्या पत्रात कोणताही उल्लेख करण्यात आला नव्हता. शनिवारी कार्याध्यक्ष शशांक मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘आयसीसी’ कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये हा विषय चर्चेला आला. यावेळी प्रभारी सचिव अमिताभ चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे प्रतिनिधित्व केले.