ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या प्रस्तावित टी-२० विश्वचषकाबद्दल आयसीसी बुधवारी आपला अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी आयसीसीने आपत्कालीन बैठक बोलावली असून या बैठकीत स्पर्धेचं आयोजन एक वर्ष पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर केला जाऊ शकतो. गेल्या ३ बैठकांमध्ये आयसीसी या स्पर्धेबद्दल निर्णय घेऊ शकली नव्हती. पण क्रिकेट ऑस्ट्रेलियातील काही अधिकाऱ्यांनी या स्पर्धेचं आयोजन करण्यास असमर्थता दर्शवल्यानंतर आयसीसी विश्वचषकाचं आयोजन पुढे ढकलण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. India Today ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

“टी-२० विश्वचषकासाठी नवीन तारखा जाहीर केल्या जाणार नाहीत, स्पर्धेच्या भवितव्याबद्दल गुरुवारी निर्णय घेतला जाऊ शकतो. या स्पर्धेचं आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकललं जाऊ शकतं.” आयसीसीमधील सूत्रांनी इंडिया टुडेला माहिती दिली. ३० सप्टेंबरपर्यंत ऑस्ट्रेलियात करोना विषाणूचा सामना करण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आलेलं आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियन सरकारने क्रीडा स्पर्धांसाठी नियमांमध्ये शिथीलता आणली होती. परंतू याआधीच आर्थिक संकटात सापडलेल्या क्रिकेट ऑस्ट्रेलियाने इतक्या कमी कालावधीत विश्वचषकाचं आयोजन करणं शक्य नसल्याचं जाहीर केलं आहे. अशा परिस्थितीत स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलणं हाच पर्याय आयसीसीसमोर उरतो.

टी-२० विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला आपल्या आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवण्यासाठी संधी मिळणार आहे. मात्र जोपर्यंत आयसीसीकडून यासंदर्भात अधिकृत भूमिका जाहीर केली जात नाही, तोपर्यंत आयपीएलबद्दल बीसीसीआय कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. यंदाचा हंगाम रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. यासाठी बीसीसीआय सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयपीएलचा तेरावा हंगाम जाहीर करण्याच्या तयारीत आहे.