दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिकेत भारतीय संघाला १-१ अशा बरोबरीत समाधान मानावं लागलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानात आफ्रिकेने ९ गडी राखत भारतावर मात केली. या कामगिरीचा परिणाम भारतीय कर्णधाराच्या क्रमवारीवर झालेला दिसतो आहे. टी-२० क्रमवारीत विराट कोहली दहाव्या स्थानावरुन अकराव्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीने नुकतीच नवीन टी-२० क्रमवारी जाहीर केली आहे.

इतर भारतीय फलंदाजांमध्ये रोहित शर्माने आपलं आठवं स्थान कायम राखलं आहे. तर त्याचा सलामीवीर साथीदार चौदाव्या स्थानावरुन तेराव्या स्थानावर पोहचला आहे. कसोटी संघातून बाहेर गेलेल्या लोकेश राहुलचीही क्रमवारीत घसरण झाली असून तो दहाव्या स्थानावर घसरला आहे.

दरम्यान भारतीय गोलंदाजांनाही फारशी आश्वासक कामगिरी करता आलेली नाहीये. गेले काही महिने टी-२० क्रिकेटपासून दूर राहिलेला जसप्रीत बुमराह आपल्या ३१ व्या स्थानावर कायम आहे. तर फिरकीपटू कुलदीप यादव तेराव्या स्थानावरुन चौदाव्या स्थानावर घसरला आहे. दक्षिण आफ्रिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.