पाकिस्तानच्या संघाने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील शेवटचा सामना पाच धावांनी जिंकला आणि मालिका १-१ अशी बरोबरी सोडवली. सलग दोन अर्धशतके ठोकणारा मोहम्मद हाफीज सामनावीर आणि मालिकावीर ठरला. त्यानंतर आज ICCने टी२० क्रिकेटच्या क्रमवारीची ताजी यादी जाहीर केली. त्यात पाकिस्तानचा नवा कर्णधार बाबर आझम अव्वलस्थानी कायम आहे. तर इंग्लंडच्या डेव्हिड मलानने TOP 5मध्ये प्रवेश केला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाच्या ग्लने मॅक्सवेलला एका स्थानाने खाली ढकलले आहे. TOP10मध्ये केएल राहुल दुसऱ्या स्थानी तर विराट कोहली दहाव्या स्थानी कायम आहे.

इंग्लंड-पाकिस्तान मालिकेतील इतर फलंदाजांपैकी ७१ धावांच्या दमदार खेळीसह मालिकेत १३७ धावा करणारा करणारा नवखा टॉम बॅन्टन याने १५२ स्थानांची झेप घेत ४३वे स्थान पटकावले आहे. मालिकावीर हाफीजने ६८व्या स्थानावरून ४४व्या स्थानावर उडी घेतली. तर इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोने एक स्थान वर चढत २२वे स्थान पटकावले आहे.

गोलंदाजांच्या यादीत फारसा बदल झालेला नाही. पहिल्या १०च्या क्रमवारीत शादाब खान आणि आदिल रशिद यांच्यात स्थानांची आदलाबदल झाली असून ते आता अनुक्रमे आठव्या आणि नवव्या स्थानी आहेत. याशिवाय टॉम करन सात स्थानांच्या बढतीसह २०व्या स्थानी पोहोचला आहे. अष्टपैलूंच्या यादीत कोणताही उल्लेखनीय बदल झालेला नाही.