गुडघ्याच्या दुखापतीपासून सावरुन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा पूर्वीच्याच जोमाने पुनरागमन करणे कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी कठीण गोष्ट असते. पण मोहम्मद शमीने दुखापतीवर मात करून वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात चांगली कामगिरी करुन दाखविली, असे मत भारताचा सलामीवर रोहित शर्माने व्यक्त केले.

फोटो गॅलरी: रोहितची कॅरेबियन्सविरुद्ध झंझावाती खेळी..

रोहितने या सामन्यात ५७ चेंडूत नाबाद ९८ धावांची झंझावाती खेळी साकारली. सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ४५ धावांनी विजय प्राप्त केला. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना रोहितने मोहम्मद शमीचे पुनरागमन संघासाठी आशादायक गोष्ट असल्याचे म्हटले. शमीने खूप मेहनत घेतली आहे. दुखापतीतून सावरल्यानंतरचा हा त्याचा पहिलाच सामना होता आणि त्याने अपेक्षित कामगिरी केली आहे. त्याच्या गोलंदाजीत सातत्य दिसले आणि हे चित्र संघासाठी नक्कीच आशादायी आहे, असे रोहित म्हणाला. शमी हा भारताच्या प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे. सहाजिकच त्याच्याकडून चाहत्यांना अपेक्षा या असणारच आणि तो नक्की सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करेल, असेही रोहित पुढे म्हणाला.