विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवला. मुंबईतल्या अखेरच्या टी-२० सामन्यात विराट कोहलीने विंडीजच्या गोलंदाजांची पिसं काढली. पहिल्या आणि अखेरच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विराटला मालिकावीराच्या किताबाने गौरवण्यात आलं. या कामगिरीचा ICC क्रमवारीत विराटला चांगलाच फायदा झालेला आहे. विराट आपल्या १५ व्या स्थानावरुन थेट दहाव्या स्थानावर आला आहे.

अवश्य वाचा – Video : विल्यम्सच्या गोलंदाजीवर विराटचा खणखणीत षटकार, नंतर स्वतःच झाला अवाक

याव्यतिरीक्त लोकेश राहुलच्या स्थानातही सुधारणा झाली आहे. नवव्या स्थानावरुन राहुल आता सहाव्या स्थानावर पोहचला आहे. मात्र रोहित शर्माची एका स्थानाने घसरण झाली असून तो नवव्या स्थानावर पोहचला आहे. विंडीजविरुद्ध टी-२० मालिकेनंतर आयसीसीने आपली अधिकृत क्रमवारी जाहीर केली आहे.

दरम्यान, खडतर आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची सुरुवातही खराब झाली होती. अवघ्या १७ धावांत विंडीजचे ३ फलंदाज माघारी परतले. यानंतर शिमरॉन हेटमायर आणि कायरन पोलार्ड यांनी फटकेबाजी करत झुंज देण्याचा प्रयत्न केला. हे फलंदाज विंडीजचा डाव सावरणार असं वाटत असतानाच, कुलदीप यादवने हेटमायरचा अडसर दूर केला. मात्र यानंतरही कायरन पोलार्डने आपली फटकेबाजी सुरुच ठेवली. भारतीय गोलंदाजांवर हल्ला चढवत पोलार्डने उत्तुंग षटकार ठोकले. मात्र ६८ धावांवर पोलार्ड माघारी परतल्यानंतर विंडीजच्या फलंदाजांनी हार मानली. यानंतरची भारतीय गोलंदाजांनी आपली उरली-सुरली जबाबदारी पूर्ण करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.