Ashes 2019 : अ‍ॅशेस क्रिकेट मालिकेतील बर्मिंगहॅम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला २५१ धावांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाने २५१ धावांनी विजय मिळवत ५ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. स्टीव्ह स्मिथचे दोनही डावात शतक आणि  फिरकी गोलंदाज नॅथन लायन याने दुसऱ्या डावात घेतलेल्या ६ गड्यांच्या बळावर ऑस्ट्रेलियाने हा विजय साकारला.

या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाच्या स्मिथला जागतिक कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. स्मिथने पहिल्या डावात १४४ तर दुसऱ्या डावात १२ धावा केल्या. त्याच्या खेळीच्या बळावरच ऑस्ट्रेलियाला सामना जिंकता आला. पण यामुळे भारताचा संयमी फलंदाज चेतेश्वर पुजारा याची क्रमवारीत एका स्थानाने घसरण झाली आहे. नव्या क्रमवारीनुसार स्मिथचे ९०३ गुण आहेत, तर पुजाराचे ८८१ गुण आहेत. भारतीय संघाची आता विंडीज दौऱ्यावर कसोटी मालिका होणार आहे. या मालिकेत चांगली कामगिरी करून पुन्हा आपले स्थान मिळवण्याची पुजाराला संधी आहे. या यादीत विराट कोहली ९२२ गुणांसह अव्वलस्थानी तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हा ९१३ गुणांसह दुसऱ्या स्थानी कायम आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत नॅथन लायनने दमदार कामगिरी करत ६ स्थानांची झेप घेतली आहे. सामन्यात ९ गडी टिपत तो १३ व्या स्थानी विराजमान झाला. याशिवाय दुसऱ्या डावात ४ गडी टिपणारा पॅट कमिन्स याने आपले अव्वलस्थान कायम राखले आहे.