भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील कोलकाता कसोटी अनिर्णित राहिली. मात्र या सामन्यातील वैयक्तिक खेळीचा भारतीय फलंदाजांना आयसीसी क्रमवारीत आपलं स्थान सुधरवण्यासाठी झालेला आहे. दुसऱ्या डावात १०४ धावांची नाबाद शतकी खेळी करणारा भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या क्रमवारीत सुधारणा झालेली असून, कसोटी फलंदाजांच्या यादीत विराट पाचव्या स्थानावर पोहचला आहे. तर चेतेश्वर पुजारा चौथ्या क्रमांकावर कायम राहिला आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतलं १८ वं आणि आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतलं ५० वं शतक ठोकलं. या कामगिरीचा विराट कोहलीला आपलं स्थान सुधरवण्यात मदत झालेली आहे.

याव्यतिरीक्त लोकेश राहुल क्रमवारीत ८ व्या क्रमांकावर आला असून, मुंबईकर अजिंक्य रहाणे १३ व्या क्रमांकावर राहिला आहे.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम १० फलंदाज –

१) स्टिव्ह स्मिथ – ऑस्ट्रेलिया
२) जो रुट – इंग्लंड
३) केन विलियमसन – न्यूझीलंड
४) चेतेश्वर पुजारा – भारत
५) विराट कोहली – भारत
६) डेव्हिड वॉर्नर – ऑस्ट्रेलिया
७) हाशिम आमला – दक्षिण आफ्रिका
८) लोकेश राहुल – भारत
९) अझर अली – पाकिस्तान
१०) अॅलिस्टर कूक – इंग्लंड

श्रीलंकेविरुद्ध कोलकाता कसोटीत भारतीय जलदगती गोलंदाजांनी लंकेच्या तब्बल १७ विकेट घेतल्या. फिरकीपटूंची पाटी या सामन्यात कोरीच राहिली. ज्याचा फटका क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या रविंद्र जाडेजाला बसला आहे. रविंद्र जाडेजाच्या स्थानात घसरण झाली असून तो तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे.

आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतले सर्वोत्तम १० गोलंदाज –

१) जेम्स अँडरसन – इंग्लंड
२) कगिसो रबाडा – दक्षिण आफ्रिका
३) रविंद्र जाडेजा – भारत
४) रविचंद्रन आश्विन – भारत
५) रंगना हेरथ – श्रीलंका
६) जोश हेजलवुड – ऑस्ट्रेलिया
७) नॅथन लॉयन – ऑस्ट्रेलिया
८) डेल स्टेन – दक्षिण आफ्रिका
९) नील वेंगर – न्यूझीलंड
१०) स्टुअर्ट ब्रॉड – इंग्लंड

संघांच्या क्रमवारीत भारत अजुनही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र २३ नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या अॅशेल मालिकेत या क्रमवारीची गणितं बदलण्याची शक्यता आहे. ५ सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-० किंवा त्यापेक्षा जास्त चांगल्या फरकाने जिंकल्यास ते इंग्लंडला पाठीमागे टाकू शकतील. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने ऑस्ट्रेलियावर मात केल्यास, त्यांच्या क्रमवारीत सुधारणा होऊन, ऑस्ट्रेलियाचा संघ सहाव्या स्थानावर घसरु शकतो.

आयसीसी क्रमवारीतले सर्वोत्तम संघ –

१) भारत
२) दक्षिण आफ्रिका
३) इंग्लंड
४) न्यूझीलंड
५) ऑस्ट्रेलिया
६) श्रीलंका
७) पाकिस्तान
८) वेस्ट इंडिज
९) बांगलादेश
१०) झिम्बाब्वे