भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने इतिहास रचला आहे. आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत पंतने शानदार कामगिरी केली असून जगातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजांच्या यादीत सहावा क्रमांक मिळविला आहे. भारतासाठी अशी कामगिरी करणारा ऋषभ पंत हा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज ठरला. महेंद्रसिंह धोनी आणि राहुल द्रविड या भारताच्या माजी यष्टीरक्षक फलंदाजांनाही अशी कामगिरी करता आलेली नाही.

आयसीसी कसोटी क्रमवारीत भारताच्या यष्टीरक्षक फलंदाजाने पहिल्या दहा फलंदाजांच्या यादीत स्थान मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. २३ वर्षीय ऋषभ पंतच्या खात्यात आता ७४७ कसोटी गुण आहेत. पंतसोबत न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स आणि भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा संयुक्तपणे सहाव्या स्थानी आहेत. तर विराट पाचव्या स्थानी आहे.

 

आयसीसीने बुधवारी जाहीर केलेल्या या क्रमवारीत श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने ११वे स्थान गाठले आहे. बांगलादेशविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात सलामीवीर करुणारत्नेने ११८ आणि ६६ धावांची खेळी केली होती. या कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने बांगलादेशला २०९ धावांनी नमवले होते.

 

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन ९१९ गुणांसह अव्वल स्थानी आहे, तर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ दुसर्‍या क्रमांकावर आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे अनुक्रमे १४व्या आणि १५व्या स्थानावर आहेत. पाकिस्तानचा कर्णधार आणि जगातील अव्वल क्रमांकाचा एकदिवसीय फलंदाज बाबर आझम नवव्या स्थानावर घसरला आहे.