श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर आयसीसीने जारी केलेल्या क्रमवारी यादीत विराट कोहलीने मोठी झेप घेतली. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेती दमदार कामगिरीच्या जोरावर कोहलीने पाचव्या स्थानावरुन दुसऱ्या स्थानावर मजल मारली. आयसीसी कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टिव्ह स्मिथ ९३८ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहलीचा क्रमांक लागतो.

इंग्लंडचा कर्णधार जो रुट ८७९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, भारताच्या मध्यफळीतील भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा (८७९) गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या केन्स विलियम्सने अव्वल पाचमध्ये स्नान मिळवले आहे. त्याने ८६५ गुण मिळवले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्या स्थानावर असणारा विराट कोहली एकदिवसीय आणि टी-२० मध्ये अव्वल स्थानी आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीने १५२.५० च्या सरासरीनं ६१० धावा केल्या होत्या. पहिल्या कसोटीतील पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात विराटने नाबाद (१०४) धावांची खेळी केली. त्यानंतर नागपूरमध्ये त्याने (२१३) तर दिल्लीच्या मैदानात (२४३) आणि (५०) धावा केल्या. विशेष म्हणजे तीन सामन्यांच्या मालिकेत ६०० पेक्षा अधिक धावा करणारा तो पहिला भारतीय फलंदाज आहे.
यावर्षाअखेर विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवण्यात अपयश आले. मात्र, आगामी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याला स्मिथला मागे टाकण्याची संधी आहे. या दौऱ्यातील त्याच्या कामगिरी पाहणे उत्सुकतेचे ठरेल.