अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने दमदार कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने अ‍ॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून ठेवण्यात यश मिळवले. पाच सामन्यांच्या मालिकेत त्याने २-१ अशी आघाडी घेतली.

स्टीव्ह स्मिथने या सामन्यात अप्रतिम खेळी करत द्विशतक ठोकले आणि विजयाचा पाया रचला. त्याने ३१९ चेंडूत २११ धावा केल्या. त्या खेळीत त्याने २४ चौकार आणि २ षटकार लगावले. त्याच्या या खेळीच्या जोरावर स्मिथने ICC च्या कसोटी क्रमवारीतील आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. पण महत्वाचे म्हणजे यामुळे कोहली आणि स्मिथ यांच्यातील गुणांंचे अंतर हे ३४ रेटिंग पॉईंट्सचे झाले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या ICC च्या क्रमवारीत स्मिथच्या खात्यात ९३७ गुण जमा झाले आहेत, तर विराटच्या खात्यात केवळ ९०३ गुण आहेत.

विराट कोहली आता दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आधी टी २० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर तो कसोटी मालिका खेळणार आहे. मात्र स्टीव्ह स्मिथच्या हातात अ‍ॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेतील आणखी एक सामना आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली खेळी करून ही आघाडी आणखी वाढवण्याची संधी स्मिथकडे असल्याने स्मिथ सध्या विराटसाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.

दरम्यान, फलंदाजांच्या यादीतील पहिल्या १० क्रमांकांमध्ये कोणतेही बदल झालेले नाहीत. गोलंदाजांच्या टॉप १० च्या यादीत मात्र जेम्स अँडरसन, नील वॅग्नर आणि केमार रोच यांच्या स्थानांनी धक्का बसला आहे. तर वर्नन फिलंडर आणि जोश हेजलवूड यांना क्रमवारीत बढती मिळाली आहे. तर टॉप १०च्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत शाकिब अल हसन रवींद्र जाडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांना बढती मिळाली असून बेन स्टोक्स आणि पॅट कमिन्स यांची घसरण झाली आहे.